मिर्झापूर द मुव्हीचा भौकाल (दबदबा) कायम पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले असताना १०० कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्या अभिनयाने सजलेला 'मिर्झापूर द मुव्ही' सध्या चित्रपटगृहांमध्ये तुफान कमाई करत आहे. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या गँगस्टर ड्रामाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही जोरदार पसंती मिळताना दिसत आहे. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने तिकिट खिडकीवर आपली मजबूत पकड दाखवत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मारायला तयार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीत 'मास ॲक्शन' चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने २५ कोटी रुपयांची (नेट) कमाई केली, जी या वर्षातील बॉलीवूड चित्रपटांच्या सर्वात मोठ्या सुरुवातींपैकी एक ठरली. शनिवारी कमाईत २५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन चित्रपटाने ३२ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई ५७.७५ कोटी रुपये (नेट) झाली.
रविवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल १२.५ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली. शुक्रवारी २५.७५ कोटी रुपयांनी खातं उघडणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ३२ कोटी, तर रविवारी तब्बल ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. देशभरात याचे ११,३४४ शोज सुरु आहेत. फरहान अख्तर यांच्या निर्मितीत बनलेल्या या चित्रपटाने भारतात पहिल्या तीन दिवसांत एकूण ९३.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही या चित्रपटाचा जलवा पाहायला मिळतोय. रविवारी ७ कोटींची कमाई करत चित्रपटाचा जगभरातील तीन दिवसांचा एकूण आकडा १३२.३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
'अल्फा'ला टाकले मागे
साधारणपणे, हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्या वीकेंडला ९० कोटींहून अधिक कमाई करणे विशेष बाब आहे. 'मिर्झापूर'ने पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्यासारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाची श्रेणी आणखी उंचावली आहे.
या जबरदस्त सुरुवातीच्या वीकेंडचा अर्थ असाही होतो की, 'मिर्झापूर द मूव्ही'ने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांच्या एकूण कमाईचा आकडा आधीच मागे टाकला आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी यांची मुख्य भूमिका असून 'अल्फा'ने ६० कोटी रुपये कमावले
'मिर्झापूर: द मुव्ही'बद्दल थोडेसे..
ॲमेझॉन एम जीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे सादर केल्या जाणाऱ्या 'मिर्झापूर: द मुव्ही'चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे, तर याचे लेखन पुनीत कृष्ण यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली. कासिम जगमगिया, विशाल रामचंद्रनी सह-निर्माते आहेत.