Mardaani 3 Promotion Controversy: मर्दानी 3 चित्रपटाच्या प्रमोशनवरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरु झाला आहे. राणी मुखर्जीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, काही रिपोर्ट्समुळे निर्मात्यांवर टीकेची झोड उठली आहे.
सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला की, चित्रपटाच्या प्रचारासाठी दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या संवेदनशील आकडेवारीचा वापर करण्यात आला. कारण ‘मर्दानी 3’ हा चित्रपटही महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विषयावर आधारित आहे. त्यामुळे काही युजर्सनी प्रश्न उपस्थित केला की, गंभीर सामाजिक प्रश्नांचा वापर केवळ चित्रपटाच्या जाहिरातीसाठी तर केला जात नाही ना?
हा वाद वाढताच चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सने (YRF) अधिकृत निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. YRF च्या म्हणण्यानुसार, “आमची कंपनी गेली 50 वर्षे नैतिकता आणि पारदर्शकतेच्या तत्वांवर काम करत आहे. ‘मर्दानी 3’च्या प्रमोशनसाठी कुठल्याही संवेदनशील माहितीचा मुद्दाम वापर करण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आहेत. योग्य वेळी सर्व खरी माहिती समोर येईल.”
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिल्लीतील बेपत्ता मुलींच्या घटनांना जोडून बातम्या पसरवल्या गेल्या. यानंतर अनेकांनी निर्मात्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी हे बेजबाबदार वर्तन असल्याचं म्हटलं.
मात्र YRF ने स्पष्ट केलं की, ‘मर्दानी 3’ ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. या चित्रपटाचा उद्देश मनोरंजनासोबत समाजात जागरूकता निर्माण करणं हा आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही.
‘मर्दानी’ चित्रपटाचे आधीचे भागही महिलांवरील गुन्हे आणि सामाजिक वास्तव संवेदनशील पद्धतीने मांडणारे होते. त्यामुळे नव्या भागाबाबतही गैरसमज पसरवू नयेत, असं निर्मात्यांनी सांगितलं आहे. एकीकडे चित्रपटाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे प्रमोशनवरून सुरू झालेला हा वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.