Prathamesh Kadam Passed Away: रिलस्टार प्रथमेश कदम याचं 26 जानेवारी रोजी निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम ही माय-लेकाची जोडी रिल्समधून घराघरात पोहोचली होती. त्यांच्या व्हिडीओंमधील साधेपणा, आपुलकी आणि निखळ भावना लोकांना आवडत होती.
मात्र गेल्या महिन्याभरापासून प्रथमेश गंभीर आजाराशी झुंज देत होता. उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालावत होती आणि अखेर त्याने जगाचा निरोप घेतला. प्रथमेशच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, आई प्रज्ञा कदम आणि त्याची लहान बहीण या दोघीच आता कुटुंबात आहेत. इतक्या लहान वयात प्रथमेश गेल्याने अनेक कलाकार, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रथमेशच्या मृत्यूबाबत विविध तर्क-वितर्क आणि अफवा पसरवल्या जात असल्याचं पाहायला मिळालं. यावर प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने स्पष्टीकरणं दिलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं आहे.
तन्मयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, प्रथमेश गेल्या काही काळापासून टायफॉईड आणि रक्तामधील कावीळ (जॉन्डिस) या गंभीर आजारांनी त्रस्त होता. डॉक्टरांकडून उपचार सुरू होते, मात्र सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही. “आज त्याच्या आई आणि बहिणी या अवस्थेत नाहीत की त्यांनी प्रत्येक अफवेला उत्तर द्यावं. त्यामुळे कुणीही चुकीची माहिती पसरवून त्याच्या दुःखात भर घालू नये,” अशी कळकळीची विनंती तन्मयने केली आहे.
प्रथमेशचा प्रवास अल्पकाळाचा असला, तरी त्याने आपल्या साधेपणाने अनेकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. आज तो आपल्यात नसला, तरी त्याच्या रिल्समधील आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील, असेही तन्मय पाटेकरने सांगितलं आहे.