Sanket Pathak Viral Video: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संकेतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रचंड संतापलेला दिसत आहे. एका राजकीय व्यक्तीमुळे आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
इतकंच नाही, तर संबंधित व्यक्तीला थेट इशाराही दिला आहे. 'याचा गेम मी चेंज करणार', असं म्हणत संकेतने उघडपणे आव्हान दिलं आहे. त्यामुळे त्याच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संकेत पाठकने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या शांत स्वभावामुळेही तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र, आता त्याचा एक वेगळाच व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्याने एका व्यक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाला संकेत पाठक?
संकेतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ त्याने कारमध्ये शूट केला आहे. व्हिडीओमध्ये तो राजकारणातील एका व्यक्तीबद्दल बोलताना दिसतो. संबंधित व्यक्तीच्या वागण्यामुळे आपण त्रस्त असल्याचं त्याने सांगितलं आहे.
व्हिडीओमध्ये संकेत म्हणतो, “राजकारणात माणूस कुठल्याही लेव्हलला असला तरी तो स्वार्थीच असतो. मी अशाच एका व्यक्तीबद्दल तुमच्याशी बोलतो आहे, कारण याने जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे. आजपर्यंत मी कधीच कोणाबद्दल असं समोर येऊन काहीही बोललो नव्हतो, पण आता पाणी खरंच डोक्याच्या वरून गेलं आहे.”
पुढे त्याने आपला संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीला कठोर शब्दांत सुनावलं. “अशा व्यक्तीला चपलेने मारायची वेळ आली आहे, कारण याची हीच लायकी आहे. याचं नाव आणि याने काय केलं हे मी सगळ्यांना सांगणार आहे, कारण आता मला फरक पडत नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि याच भाषेत सांगायचं तर आता याचा गेम मी चेंज करणार आहे, उपट काय उपटायचं ते,” असं तो म्हणाला.
संकेतच्या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण
संकेतचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेहमी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा संकेत इतका संतापलेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. त्याने यापूर्वी कधीही अशा प्रकारे जाहीरपणे कोणावर नाराजी व्यक्त केली नव्हती.
त्यामुळे संकेतला नेमका कोणत्या राजकीय व्यक्तीचा त्रास होत आहे? संबंधित व्यक्तीने त्याच्यासोबत काय केलं? तसेच संकेत आता कोणता खुलासा करणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, संकेतने अद्याप संबंधित राजकीय व्यक्तीचं नाव जाहीर केलं नाही. तसेच त्याला नेमका कोणत्या प्रकारचा त्रास झाला, याबाबतही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याच्या पुढील खुलाशाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आता संकेत या प्रकरणात नेमकं काय सांगणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.