Majhya Navryachi Bayko South Africa Pudhari
मनोरंजन

Majhya Navryachi Bayko: ‘माझ्या नवऱ्याची बायको’चा सातासमुद्रापार जलवा; गुरुनाथ, शनाया, राधिकेची दक्षिण आफ्रिकेत तुफान क्रेझ

Majhya Navryachi Bayko South Africa: मराठीतील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता दक्षिण आफ्रिकेत झुलू भाषेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Majhya Navryachi Bayko South Africa: मराठी मनोरंजनविश्वाची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे मराठी मालिका तिथल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचत आहेत. मराठीत गाजलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं झुलू भाषेत डबिंग करून दक्षिण आफ्रिकेत प्रसारण करण्यात येत असून, या मालिकेला तिथल्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मालिकेतील गुरुनाथ सुभेदार, शनाया आणि राधिका ही पात्रं दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. विशेष म्हणजे मालिकेतील पात्रांची मूळ नावं डबिंगमध्येही कायम ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील चाहते अभिनेते अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि शरयू सोनवणे यांना त्यांच्या मालिकेतील नावांनीच ओळखतात.

झुलू भाषेत मराठी मालिकांचा जलवा

दक्षिण आफ्रिकेतील ‘झी झॉन्की’ या वाहिनीवर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका झुलू भाषेत प्रसारित होत आहे. याशिवाय ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ यांसारख्या मराठी मालिकांनाही तिथे स्थान मिळालं आहे. याआधीही अनेक मराठी मालिकांचं स्थानिक भाषांमध्ये डबिंग करून दक्षिण आफ्रिकेत प्रसारण करण्यात आलं आहे.

भाषा बदलली तरी कथानकातील नातेसंबंध, भावनिक संघर्ष आणि कौटुंबिक प्रश्न हे प्रेक्षकांना आपलेसे वाटत असल्याचं या मालिकांच्या लोकप्रियतेतून दिसून येतं. ‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे.

गुरुनाथ, शनाया आणि राधिकेशी आफ्रिकी प्रेक्षकांचं नातं

मालिकेतील व्यक्तिरेखा केवळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच भावल्या नाहीत, तर दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षकांनीही त्यांच्याशी नातं जोडलं आहे. कुटुंबातील नातेसंबंध, गैरसमज, प्रेम, मतभेद आणि भावनिक चढ-उतार या गोष्टी कोणत्याही एका समाजापुरत्या मर्यादित नसतात. त्यामुळे मालिकेतील प्रसंग आणि व्यक्तिरेखा दक्षिण आफ्रिकेतील प्रेक्षकांनाही परिचित वाटत असल्याचं अभिजीत खांडकेकरने सांगितलं.

मराठीत लोकप्रिय ठरलेली पात्रं आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनणं, हा कलाकारांसाठीही विशेष अनुभव आहे. एका भाषेत तयार झालेली कथा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांना आवडते, यामुळे मनोरंजनाच्या जगाला भाषेच्या सीमा नसतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

कलाकारांची दक्षिण आफ्रिकेत चाहत्यांशी भेट

आपल्या मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि शरयू सोनवणे हे कलाकार सध्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. जोहान्सबर्ग आणि डर्बन या शहरांमध्ये ते स्थानिक प्रेक्षक, रेडिओ स्टेशन आणि सोशल मीडिया क्रिएटर्सशी संवाद साधणार आहेत.

यातील सर्वात खास आकर्षण म्हणजे मालिकेच्या झुलू डबिंगमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबत होणारा विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात मराठी कलाकार आणि झुलू भाषेतील डबिंग कलाकार एकाच प्रसंगाचं सादरीकरण करणार आहेत. पडद्यावर मालिकेतील दृश्य दाखवल्यानंतर मराठी कलाकार तो प्रसंग प्रत्यक्ष सादर करतील आणि त्याच वेळी झुलू भाषेतील कलाकार आपापल्या पद्धतीने तोच प्रसंग सादर करतील.

‘गुरुनाथ सुभेदार’ नाव दक्षिण आफ्रिकेतही ओळखीचं

अभिजीत खांडकेकरसाठी या प्रवासातील सर्वात वेगळा अनुभव म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील चाहते त्याला त्याच्या खऱ्या नावाने नव्हे, तर ‘गुरुनाथ सुभेदार’ म्हणून ओळखतात. शनाया आणि राधिकाच्या व्यक्तिरेखांबाबतही अशीच परिस्थिती आहे.

मराठी मालिकेतील व्यक्तिरेखा हजारो किलोमीटर दूर, वेगळ्या भाषिक आणि सांस्कृतिक वातावरणातही त्याच नावाने ओळखल्या जाणं, ही मराठी मनोरंजनसृष्टीसाठी निश्चितच कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली एक कथा आता झुलू भाषेतून दक्षिण आफ्रिकेतील घराघरात पोहोचत आहे आणि त्यातून मराठी मालिकांना मिळणारा हा आंतरराष्ट्रीय प्रतिसाद मनोरंजनविश्वाचं लक्ष वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT