Mahesh Babu wrote post on sitara birthday
पुढारी ऑनलाईन डेस्क - दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची मुलगी सितारा सोमवारी १४ वर्षांची झाली. यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेली भावनिक पोस्ट फॅन्सच्या पसंतीस उतरली असून, वडील-लेकीच्या सुंदर नात्याची चर्चा होत आहे.
महेश बाबूने आपल्या एक्स आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर सिताराचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो सिताराच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले, "तू कितीही मोठी झालीस, तरीही तू कायम माझा छोटासा तारा राहशील. १४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सितारा! तुझं येणारं वर्ष खूप सुंदर जावो... तुझ्यावर नेहमीच खूप प्रेम आहे."
महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिनेही इन्स्टाग्रामवर लेकीसोबतचा फोटो शेअर करत भावनिक शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले, माझ्या सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमचं आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरून टाकल्याबद्दल तुझे आभार. तुला मोठं होताना पाहणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. तुझ्यावर खूप प्रेम आहे.
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांचं कुटुंब नेहमीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय राहिलं आहे. सिताराही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून, तिचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
कोण आहे सितारा?
सोशल मीडिया सेन्सेशन:
सितारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती तिचे डान्स व्हिडिओ, फोटोशूट्स आणि ट्रॅव्हलचे अपडेट्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
मॉडेलिंग:
वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी सिताराने अमेरिकेतील एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग केले होते.
चित्रपटात पदार्पण:
तिने तिचे वडील महेश बाबू यांच्या 'सरकारू वारू पाटा' (Sarkaru Vaari Paata) या चित्रपटातील 'पेनी' (Penny) गाण्यात एक छोटीशी झलक दाखवली होती.
महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचीही उत्सुकता
महेश बाबू सध्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या महत्त्वाकांक्षी 'वाराणसी' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे सुमारे ८० दिवसांचे शूटिंग अद्याप बाकी असून, हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.