Mahavatar Narsinha Oscar 2026 Pudhari
मनोरंजन

Oscars 2026: ऑस्कर 2026 मध्ये ‘महावतार नरसिंह’ची धडाकेबाज एन्ट्री! ब्लॉकबस्टर अॅनिमेशन फिल्म शॉर्टलिस्ट

Mahavatar Narsinha Oscar 2026: ‘महावतार नरसिंह’ या भारतीय अॅनिमेटेड ब्लॉकबस्टरला ऑस्कर 2026 च्या बेस्ट अॅनिमेटेड फीचर कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील दिग्गज अॅनिमेटेड फिल्म्ससोबत आता या चित्रपटाची स्पर्धा होणार आहे.

Rahul Shelke

Mahavatar Narsinha Oscar 2026: भारतीय अॅनिमेशनच्या जगात अभिमानाची घटना घडली आहे. क्लीम प्रोडक्शन्स आणि होम्बले फिल्म्सची सुपरहिट अॅनिमेटेड फिल्म ‘महावतार नरसिंह’ ऑस्कर 2026 मध्ये बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म कॅटेगरीसाठी अधिकृतरीत्या शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. अकादमीने स्वतः अपडेट देत ही माहिती जाहीर केली. आता ही भारतीय फिल्म जागतिक पातळीवरील दमदार अॅनिमेटेड चित्रपटांशी थेट स्पर्धा करणार आहे.

महावतार नरसिंहला मिळाला मोठा सन्मान

अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ने भारतात आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता या यशाचीच पुढची पायरी म्हणजे ऑस्कर 2026 मधील शॉर्टलिस्ट. या यादीत ‘ज़ूटोपिया 2’, ‘डेमन स्लेयर: किमेट्सू नो यायबा – इन्फिनिटी कॅसल’, ‘K-pop Demon Hunters’ यांसारख्या जागतिक ख्यातनाम अॅनिमेटेड फिल्म्सही आहेत.

ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये यायचे असेल तर फिल्मची लांबी 40 मिनिटांपेक्षा जास्त असावी आणि एकूण रनटाइमपैकी किमान 75% भाग अॅनिमेशनने बनलेला असावा. ‘महावतार नरसिंह’ने ही सर्व पात्रता पूर्ण केली आहे.

बॉक्स ऑफिसवर मोडले सर्व रेकॉर्ड

जुलै 2025 मध्ये रिलीज झालेली ही फिल्म जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरली. जगभरात या चित्रपटाने 325 कोटींहून अधिक कमाई करत भारतीय अॅनिमेटेड सिनेमा इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या फिल्मचा मान पटकावला. भव्य VFX, दमदार कथा आणि भारतीय मायथॉलॉजीवर आधारित मॅग्नेटिक प्रेझेंटेशनमुळे फिल्मने आठवडाभर थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला.

महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स

‘महावतार नरसिंह’ ही महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मधील पहिली फिल्म आहे. या युनिव्हर्समध्ये एकूण 7 चित्रपट येणार आहेत. यानंतरची फिल्म ‘महावतार परशुराम’ 2027 मध्ये जागतिक स्तरावर रिलीज होईल.

ऑस्कर नॉमिनेशन आणि कार्यक्रमाची तारीख

ऑस्कर 2026 साठी अधिकृत नॉमिनेशनची घोषणा 22 जानेवारी 2026 रोजी होईल.
98वे अकादमी पुरस्कार सोहळा 15 मार्च 2026 रोजी डॉल्बी थिएटर, ओव्हेशन हॉलीवुड येथे होणार असून याचे थेट प्रसारण ABC चॅनेलवर होईल.

भारतीय अॅनिमेशन उद्योगासाठी हे शॉर्टलिस्टिंग ऐतिहासिक मानले जात असून आता सगळ्यांच्या नजरा ‘महावतार नरसिंह’ ही फिल्म अंतिम नॉमिनेशनमध्ये आणि पुढे ऑस्कर ट्रॉफीपर्यंत पोहोचते का यावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT