

कोलकाता : नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ चित्रपटाला 98 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे, अशी घोषणा शुक्रवारी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष फिरदौसुल हसन यांनी येथे केली. इशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेतवा यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
उत्तर भारतातील एका गावातील दोन बालमैत्रिणींच्या पोलिस नोकरी मिळवण्याच्या प्रवासावर आधारित कथा, त्यांच्या मैत्रीत येणार्या संघर्षाचे दर्शन घडवते. कथा काश्मिरी पत्रकार बशारत पिअर यांच्या ‘टेकिंग अमृत होम’ या निबंधावर आधारित आहे. हा निबंध ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये 2020 मध्ये प्रकाशित झाला होता.
इतर महत्त्वाचे ऑस्कर स्पर्धक चित्रपट
‘टॅनवी : द ग्रेट’, ‘द बंगाली फाईल्स’, ‘पुष्पा-2’, ‘कन्नप्पा’, ‘जुगनूमा’, ‘केसरी चॅप्टर-2’ आणि ‘फुले’ यासारखे चित्रपटदेखील भारतातून ऑस्कर स्पर्धेसाठी विचारात घेतले गेले होते.
जागतिक गौरव
‘होमबाऊंड’ने 2025 च्या कान्स चित्रपट महोत्सवात यूएन सर्टन रिगार्ड विभागात जागतिक पदार्पण केले आणि तिथे नऊ मिनिटांची स्टँडिंग ओवेशन मिळवली. याशिवाय, मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार जिंकले. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पीपल्स चॉईस इंटरनॅशनल’मध्ये दुसरा रनर-अप ठरला.