पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची निर्मिती असलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या चित्रपटाला टॉप १५ शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळाले नाही. यामुळे या चित्रपटाला बाहेर पडावे लागले आहे. हा चित्रपट आमिर खानची पत्नी किरण राव हिने दिग्दर्शित केला होता. यानंतर आता आमिर खान प्रॉडक्शनने 'लापता लेडीज'ला ऑस्करमधून वगळल्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खान आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ''लापता लेडीज'ने यावर्षी ऑस्कर पुरस्कारांच्या शॉर्टलिस्टमध्ये गेला नाही. यामुळे आम्ही निराश झालो आहोत, परंतु, या प्रवासात आम्हाला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. अकादमी सदस्य आणि एफएफआय ज्युरींचे आभार मानतो. या प्रतिष्ठित कार्यक्रमात सामील होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा चित्रपट जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या बरोबरीने ठेवण्यात आला होता.''
''आम्ही टॉप १५ शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांच्या सर्व टीम्सचे अभिनंदन करतो आणि पुरस्कारांच्या पुढील टप्प्यांसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आमच्यासाठी हा शेवट नसून एक पाऊल पुढे आहे. आम्ही अधिक प्रभावी कथा आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.'' असेही ते यावेळी म्हणाले.
'लापता लेडीज' चित्रपटाला २३ सप्टेंबर रोजी, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर २०२५ मध्ये पाठवण्याची घोषणा केली होती. परंतु, आता हा चित्रपट १५ शॉर्टलिस्टमधून बाहेर पडला आहे. ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. तर ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ ला होणार आहे.