jimmy Shergill Father passed away
मुंबई – बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जिम्मी शेरगिलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जिम्मी शेरगिलच्या वडिलांचे निधन झाले असून चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. जिम्मीचे वडील सत्यजीत सिंह शेरगिल आजारी होते. ते नव्वद वर्षांचे होते. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. जिम्मीचे वडील उत्तम चित्रकार होते.
रिपोर्ट्सनुसार, १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार केले जातील. सायंकाळी ४ वाजता मुंबईतील सांताक्रूज वेस्ट गुरुद्वारात सत्यजीत सिंह शेरगिल यांना अंतिम निरोप देण्यात येणार आहे.
जिम्मी शेरगिलने बॉलिवूडमध्ये मोहब्बतें, तनु वेड्स मनु, साहेब बीवी और गँगस्टर, आवारापन, मुक्काबाज अशा हिट चित्रपटांत काम केलं आहे.
एका शीख परिवारात जन्मलेले जिम्मीचे वडील मूळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सरदारनगरचे देवकहिया गावचे राहणारे होते. एका मुलाखतीत जिम्मीने सांगितलं होतं की, किशोरावस्थेत त्याच्या आणि वडिलांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कारण जिम्मीने आपले केश (केस) कापण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्याच्या वडिलांना हे मान्य नव्हते आणि दीड वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत.