Jennifer Winget wedding bell
टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जेनिफर सिंगापूर स्थित उद्योजक विल्यम इश्माएल याच्यासोबत १६ जुलै रोजी युनायटेड किंगडममध्ये एका अत्यंत खासगी सोहळ्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताला जेनिफर किंवा तिच्या टीमकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या विवाह सोहळ्यासाठी केवळ दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ पूर्णपणे खासगी ठेवण्याचा निर्णय जोडप्याने घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या विवाहाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
खास वेडिंग गाऊन
सूत्रांच्या माहितीनुसार, जेनिफर या लग्नात कार्लियो द्वारा डिझाईन केलेला ब्रायडल व्हाईट गाऊन परिधान करेल. गेल्या काही महिन्यांपासून जेनिफर विंगेट आणि विल्यम इश्माएल यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या चर्चांना आणखी उधाण आले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या.
कोण आहे होणार पती?
विल्यम इश्माएल हे सिंगापूरमध्ये राहणारे बिझनसमॅन आहेत. आता ते एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि ट्रेडिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईल वरून असे समजते की, त्यांनी यॉर्क युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्स आणि फायनान्समधून शिक्षण घेतलं आहे. २००२ ते २००५ च्या दरम्यान त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. असून ते वित्त आणि ट्रेडिंग क्षेत्राशी संबंधित असल्याचे वृत्त आहे.
जेनिफर विंगेट ही हिंदी टेलिव्हिजनमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 'दिल मिल गए', 'सरस्वतीचंद्र', 'बेहद', 'बेपनाह', 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. ओटीटीवरील 'कोड एम' या मालिकेतही तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
जेनिफरने २०१२ मध्ये दिल मिल गए फेम अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी लग्न केले होते. पण काही काळानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. आता वयाच्या ४१ व्या वर्षी ती पुन्हा लग्नबंधनात अडकतेय.