varhadi vajantri marathi film  
मनोरंजन

Jaywant Wadkar : जयवंत वाडकर ‘वऱ्हाडी वाजंत्री’मध्ये वेगळ्या रूपात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात विनोदी अभिनेते जयवंत वाडकर यांनी एका राजेशाही विवाहसोहळ्यात आहेरावरच डल्ला मारला आहे. (Jaywant Wadkar) त्यांना यासाठी अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री साक्षी परांजपे आणि शितल कलाहापुरे यांनी साथ दिली आहे… चमकलात ना हे वाचून? …बरोबर आहे तुमचं! सेलिब्रेटी असलेल्या या बिनीच्या कलावंतांकडून असं घडेलच कसं? … पण तसं घडलंय! आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटाच्या निमित्तानं! (Jaywant Wadkar)

जयवंत वाडकर 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला 'वऱ्हाडी वाजंत्री' ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वराज फिल्म प्रॉडक्शन या बॅनरची असून निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका पेक्षा एक वल्ली कॅरेक्टर पाहायला मिळणार असल्याचं जयवंत यांनी सांगितलं.

वाडकर म्हणाले की, वैभव परबनं अतिशय सुरेख लेखन केल्यामुळं आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये काम करताना खूप धमाल आली. दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. कोणत्याही लग्नात वेगवेगळ्या स्वभावाची, भिन्न विचारांची आणि निरनिराळे हेतू असलेली मंडळी एकत्र येतात आणि लग्नसोहळा साजरा करतात. या सोहळ्यात मी रावसाहेब नावाच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे. याचा लग्नात मिळणाऱ्या आहेरावर डोळा आहे. आहेराच्या पैशावर हात साफ करण्यासाठी हा लग्नाला आला आहे. हे कॅरेक्टर ग्रे शेडेड नाही. काहींना पैसे बघितले की ते आपल्याकडे यावेत असं वाटतं अशांपैकी हा आहे.

चित्रपटात याची फॅमिलीही आहे. याचे वडील वयस्कर असल्यानं त्यांना उचलून लग्नात आणताना फुल धमाल होते. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखं आहे. विजयनं सर्व कॅरेक्टर्स एकाच फ्रेममध्ये सादर केली आहेत. रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे. पॅडी कांबळे आणि हेमांगी कवीचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT