Javed Akhtar Ram Statement Pudhari
मनोरंजन

Javed Akhtar: 'हिंदुस्तानातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम...', जावेद अख्तरांच्या विधानाने पेटला वाद; मौलाना संतापले, दिलं प्रत्युत्तर

Javed Akhtar Ram Statement: जावेद अख्तर यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम असल्याचे विधान केले आहे.

Rahul Shelke

Javed Akhtar Ram Statement: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर सध्या त्यांच्या 'राम'विषयीच्या विधानामुळे चर्चेत आहेत. 'हिंदुस्तानातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम आहे. ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो,' असे विधान जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे मौलाना साजिद रशीदी यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत त्यांना नाव बदलून 'रामपाल' ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

एका कार्यक्रमात जावेद अख्तर यांना शाहरुख खानच्या 'स्वदेस' चित्रपटातील 'पल पल है भारी...' या गाण्याबद्दल विचारण्यात आले. या गाण्यातील 'मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं' या ओळींनी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांना नुकत्याच चर्चेत असलेल्या 'रामायण' चित्रपटाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना जावेद अख्तर म्हणाले की, राम हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाही, तर ते आदर्श आणि जगण्याची एक पद्धत आहे. भारतातील प्रत्येक माणसाच्या रक्तात राम आहे. तो कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्यात रामाचे विचार आणि मूल्ये आहेत.

यावेळी त्यांनी कवी अब्दुल रहीम खानखाना यांचा दोहाही ऐकवला. 'अब रहीम मुश्किल पड़ी, गाढ़े देऊ काम, सांचे से तो जग नहीं, झुठे मिलै न राम,' असे ते म्हणाले.

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाबद्दल विचारले असता, आपण अद्याप हा चित्रपट पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांची मुलगी झोया अख्तर हिने हा चित्रपट पाहिला असून तिला तो आवडल्याचेही त्यांनी सांगितले.

मौलाना साजिद यांची टीका

जावेद अख्तर यांच्या विधानावर मौलाना साजिद रशीदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, जावेद अख्तर आणि त्यांचे कुटुंबीय हे बॉलीवूडमधील व्यावसायिक लोक आहेत. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी आणि आपली गाणी विकली जावीत यासाठी ते अशी विधाने करतात.

साजिद रशीदी यांनी असा दावाही केला की, जावेद अख्तर यांनी अनेकदा आपण नास्तिक असल्याचे सांगितले आहे. ते कोणत्याही धर्माला मानत नाहीत आणि अल्लाह किंवा राम यांच्यावरही त्यांचा विश्वास नाही, असे त्यांनी म्हटले होते.

याच मुद्द्यावरून साजिद रशीदी यांनी जावेद अख्तर यांना टोला लगावला. ते म्हणाले, "जर तुम्हाला रामाबद्दल एवढीच आस्था असेल, तर तुम्ही घरवापसी करा आणि जावेद अख्तरऐवजी तुमचे नाव रामपाल ठेवा. असे केल्यास किमान ८० टक्के हिंदू तुमचा आदर करतील."

याशिवाय त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर दोन्ही बाजूंनी भूमिका घेण्याचा आरोप केला. "तुम्ही एकाच वेळी दोन बाजूंना खूश करू शकत नाही. तुम्ही दोन जहाजांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे एक बाजू निवडली पाहिजे," असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी ज्येष्ठ गीतकार कैफी आझमी यांचाही उल्लेख केला. कैफी आझमी यांनी गाणी लिहिली, पण पैशांसाठी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही, असे ते म्हणाले. जावेद अख्तर यांच्यावर टीका करताना त्यांनी कठोर शब्दांचाही वापर केला.

धर्माबद्दल काय म्हणाले होते जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी यापूर्वीही अनेकदा धर्म आणि श्रद्धेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, धार्मिक लोकांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. त्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आणि त्यांचे शिक्षणही त्याच वातावरणात झाले. मात्र, किशोरवयातच ते नास्तिक झाले.

धर्मावरून काही लोक आपल्याला ट्रोल करतात, तर काही जण पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतात, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अशा टीकेकडे आपण विनोद म्हणून पाहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जावेद अख्तर यांच्या 'प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे' या विधानामुळे सुरू झालेली चर्चा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT