comedian punjabi film star jaswinder bhalla
मुंबई - पंजाबचे प्रसिद्ध कॉमेडियन आणि स्टार जसविंदर भल्ला यांचे निधन झाले आहे. त्यांनी ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार २३ ऑगस्ट रोजी केले जाईल. जसविंदर दीर्घकाळ आजारी होते. जसविंदर भल्ला यांच्या निधनानंतर संपूर्ण पंजाबी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जसविंदर यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले.
जसविंदर यांची मुलगी युरोपमध्ये राहते आणि पिताच्या निधनाचे वृत्त ऐकून ती वापस येत आहे. मोहाली येथील घरात त्यांचा मुलगा होता. त्याच्यासोबत जसविंदर राहत होते. जसविंदर यांचे मित्र कॉमेडियन पम्मी यांनी सांगितलं की, आजारपणामुळे ते चित्रपटांपासून दूर होते. त्यांना मधुमेह आणि हृदयरोगाशी संबंधित आजार होते.
जसविंदर भल्ला आपल्या कॉमिक टायमिंग साठीच नाही तर अभिनयासाठीही प्रसिद्ध होते. त्यांनी १९८८ मध्ये 'छंकार्टा ८८' मधून आपले करिअर सुरू केले होते. त्यानंतर 'जिन्हे मेरा दिल लुटेया', 'जीजा जी', 'कबड्डी वन्स अगेन', 'पावर कट', 'माहौल ठीक है', 'अपन फिर मिलांगे', 'मेल करा दे रब्बा', 'कॅरी ऑन जट्टा', 'कॅरी ऑन जट्टा 3' आणि 'जट्ट अँड जूलियट' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी जसविंदर हे पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान त्यांनी युनिव्हर्सिटीच्या अनेक तंत्रांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले होते.
जसविंदर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार २३ ऑगस्ट पर्यंत दुपारी १२ वाजता मोहालीच्या बलोंगी स्मशानभूमीत केले जाईल.