Jahnavi Killekar Nanded Dahi Handi Controversy Pudhari
मनोरंजन

Jahnavi Killekar: ‘माझ्या हातात माईक असताना...’; नांदेडच्या दहीहंडीत नेमकं काय घडलं? जान्हवी किल्लेकरने केला मोठा खुलासा

Jahnavi Killekar Nanded Dahi Handi Controversy: नांदेडमधील दहीहंडी कार्यक्रमात जान्हवी किल्लेकर संतापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Rahul Shelke

Jahnavi Killekar Nanded Dahi Handi Controversy: दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नांदेडमधील एका दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर हिच्या संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मंचावर नेमकं काय घडलं, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता जान्हवीने स्वतःच याचा खुलासा केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर काही नेटकऱ्यांनी जान्हवीचा राग हा रीलस्टार प्रणाली सूर्यवंशीच्या लोकप्रियतेशी जोडला. मंचावर प्रणालीचं कौतुक होत असताना आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याने जान्हवी नाराज झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, जान्हवीच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात घडलेला प्रकार यापेक्षा वेगळा होता.

कार्यक्रमातील शांतता पाहून जान्हवीने घेतला माईक

नांदेडमधील कार्यक्रमात पोहोचल्यानंतर मंचासमोरील वातावरण अपेक्षेप्रमाणे उत्साही नसल्याचं जान्हवीच्या लक्षात आलं. डीजे सुरू असूनही प्रेक्षकांमध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता. लोक शांतपणे उभे असल्याने कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी तिने स्वतःहून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.

जान्हवीने आयोजकांकडे माईक देण्याची विनंती केली. प्रेक्षकांशी संवाद साधून वातावरणात उत्साह निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यानुसार साऊंड सिस्टीमवरील कर्मचाऱ्याने तिच्या हातात माईकही दिला. मात्र, ती बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वीच मंचावरील परिस्थिती अचानक बदलली.

‘माझ्या हातात माईक असताना...’ जान्हवीचा अँकरवर निशाणा

जान्हवीच्या म्हणण्यानुसार, ती माईक हातात घेऊन बोलणार इतक्यात कार्यक्रमाच्या अँकरने अनाउन्समेंट करण्यास सुरुवात केली. त्याने जान्हवी किल्लेकर मंचावर असल्याचं सांगितलं आणि ती प्रेक्षकांशी संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं.

मात्र, त्यानंतर अँकरने लगेचच प्रणाली सूर्यवंशीचं नाव घेतलं. प्रणालीचे प्रसिद्ध डायलॉग ऐकण्यासाठी प्रेक्षकांना विचारणा करण्यात आली. यामुळे जान्हवी संतापली.

माईक आधीच आपल्या हातात असताना आणि आपण प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या तयारीत असताना दुसऱ्या कलाकाराची घोषणा का करण्यात आली, असा तिचा सवाल होता.

‘प्रत्येकाची आवड वेगळी असते...’

या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना जान्हवीने प्रणाली सूर्यवंशीबद्दल कोणताही वैयक्तिक आक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं. प्रणालीचे डायलॉग लोकप्रिय आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतात, याचीही तिला जाणीव असल्याचं तिने सांगितलं.

मात्र, मंचावरील शिस्त आणि क्रम पाळणं आवश्यक असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिच्या हातात माईक असताना अचानक दुसऱ्या व्यक्तीची घोषणा करणं हे तिला खटकलं.

‘कोणाच्या हातात माईक आहे आणि कोण आधी बोलणार आहे, याचं भान अँकरने ठेवायला हवं,’ अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली.

मयुरी नव्हातेनेही दिला दुजोरा

या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री मयुरी नव्हाते हिचीही चर्चा झाली. ती देखील त्यावेळी कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित होती. सोशल मीडियावरून तिने या घटनेबाबत आपली भूमिका मांडत जान्हवीच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता.

जान्हवीच्या खुलाशानंतर नांदेडमधील त्या दहीहंडी कार्यक्रमातील नेमक्या घटनेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला नवं वळण मिळालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT