India’s Got Latent PM Modi Mimicry Pudhari
मनोरंजन

India’s Got Latent: ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये पंतप्रधानांची मिमिक्री; समय रैनाच्या शोमध्ये कुणाल कामराचीही एन्ट्री, काय घडलं?

India’s Got Latent PM Modi Mimicry: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये राहिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींंची मिमिक्री करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Rahul Shelke

स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोच्या नव्या भागात राहिल नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री केली आहे. त्याचा लूक आणि पंतप्रधानांची नक्कल करण्याची शैली पाहून समय रैना आणि तन्मय भट्ट यांच्यासह पॅनेलवरील सदस्यही आश्चर्यचकित झाले.

पंतप्रधानांच्या वेशात राहिलची एन्ट्री

‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नव्या भागात राहिल नावाची व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेशात मंचावर आली. त्याचा गेटअप पाहून पॅनेलमध्ये बसलेल्या समय रैना आणि तन्मय भट्ट यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. या भागात रॅपर एमसी स्टॅनही उपस्थित होता. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता.

यावेळी समय रैनाने मास्कचा संदर्भ देत मिश्किल टिप्पणी केली. शोमध्ये पुन्हा एखादा वाद निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता समयला जाणवल्याचे या प्रसंगावरून दिसले.

यानंतर राहिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली. त्याने पंतप्रधानांच्या काही गाजलेल्या प्रसंगांचाही उल्लेख केला. त्याच्या मिमिक्रीमुळे शोमध्ये विनोदाची रंगत वाढली.

कुणाल कामरासोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा

या भागातील आणखी एक लक्षवेधी प्रसंग म्हणजे कॉमेडियन कुणाल कामराची एन्ट्री. समय रैनाने कुणाल कामराला व्हिडिओ कॉल केला आणि पंतप्रधानांची मिमिक्री करणाऱ्या राहिलशी त्याची चर्चा घडवून आणली.

राहिलचा पंतप्रधानांसारखा लूक आणि त्याची मिमिक्री पाहून कुणाल कामराही आश्चर्यचकित झाला. या संवादात रुपया घसरल्याचा उल्लेख झाला. कुणाल आणि पंतप्रधानांची भूमिका साकारणाऱ्या राहिल यांच्यात मजेशीर संवाद रंगला.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचीही मिमिक्री करण्याचा प्रयत्न

कार्यक्रमाच्या शेवटी राहिलने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच समय रैनाने त्याला थांबवले. त्यामुळे हा प्रसंगही चर्चेचा विषय ठरला आहे.

राहिलच्या या परफॉर्मन्सला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काही जण त्याच्या मिमिक्रीचे कौतुक करत आहेत, तर काही जण शोमधील या प्रसंगावर आपली मते मांडत आहेत.

वादांनंतर समय रैनाचे पुनरागमन

समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो यापूर्वीही अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे. शोमधील काही वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी समय रैनासह संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर झाला होता.

या वादानंतर समयने पुन्हा मनोरंजनाच्या क्षेत्रात सक्रिय होत आपले काम सुरू ठेवले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समय रैनाचा सन्मान केला होता.

आता ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील पंतप्रधानांच्या मिमिक्रीचा हा भाग पुन्हा चर्चेत आला असून, राहिलचा परफॉर्मन्स आणि कुणाल कामरासोबत झालेला संवाद याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT