Neena Gupta role in Panchayat 4  Instagram
मनोरंजन

Panchayat 4 | ‘पंचायत’मधील मंजू देवीची भूमिका नीना गुप्ताला कशी मिळाली?

Panchayat 4 Neena Gupta | 'पंचायत'साठी नीना गुप्ता यांची निवड कशी झाली?

स्वालिया न. शिकलगार

Neena Gupta Manju Devi role in Panchayat 4

मुंबई - अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवायला सज्ज झाल्या आहेत. पंचायत सीझन ३ मध्ये 'मंजू देवी'च्या भूमिकेनंतर आथा त्या पंचायत सीझन ४ मध्येदेखील सत्ता संघर्षाच्या रणांगणात उतरताना दिसणार आहेत. फुलेरा नावाच्या गावात मंजू देवी आणि त्यांची प्रतिस्पर्धी क्रांती देवी दोन तगड्या स्पर्धकांमधील सत्तेच्या संघर्षाची कहाणी पाहता येणार आहे. राजकीय प्रचारसभांमधील गाणी, आश्वासनांचा पाऊस आणि केवळ जल्लोषाने रणधुमाळीचे मैदान फुललेले दिसते. एकमेकांविरोधात डावपेच आखण्यासाठी आणि एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन गट काय काय प्लॅन आखतात, हे ‘पंचायत’ सीझन ४ मध्ये पाहता येणार आहे. २४ जून रोजी प्राईम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये हा सीझन पाहता येणार आहे.

नीना गुप्ता 'पंचायत' या लोकप्रिय मालिकेच्या चौथ्या सीझनमध्ये मंजू देवी दुबे (गावाची सरपंच) ही भूमिका पुन्हा साकारणार आहे. या मालिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि दुर्गेश कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. टीव्हीएफ निर्मित ही मालिका दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांच्या दिग्दर्शनाखाली बनवली असून, पटकथा चंदन कुमार यांनी लिहिलेली आहे.

नीना गुप्ता आपल्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या?

एका वृत्तसंस्थेशी बोलनाता नीना म्हणाल्या- “लोकांना मी प्रामुख्याने दोनच कारणांमुळे आठवते – 'छोली के पीछे' गाणे आणि 'पंचायत'. सध्या माझ्या लोकप्रियतेचं मुख्य श्रेय 'पंचायत'लाच जाते. मी कुठेही गेले, अगदी परदेशातदेखील लोक विचारतात की ‘पंचायत केव्हा येणार?” ‘मंजू देवी’ या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या, या पात्राने एका साध्याशा गावातील स्त्रीपासून आत्मविश्वासू नेतृत्त्ववान स्त्रीचा प्रवास केला आहे. हे पात्र अनेक ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायक ठरेल.

'पंचायत'मध्ये मंजू देवीने काय दाखवून दिलं?

एका मुलाखतीत नीना म्हणाल्या की, ''पंचायतमधील प्रवास पहिल्याच सीझनपासून सुरू झाला. ध्वजारोहणाचा सीन — तोच मंजू देवीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता. बऱ्याचशा गावांमध्ये महिलांना अनेक गोष्टी न शिकवणं, किंवा न शिकणं हे सर्रासपणे चालतं. पण मला माझ्या पात्राची ही गोष्ट आवडली की तिने तो पॅटर्न तोडायचं ठरवलं. मंजू देवी आत्मनिर्भर झाली. आजही अनेक भागांमध्ये पत्नीच्या ऐवजी नवऱ्याचंच नियंत्रण असलेली प्रथा चालू आहे. पण ‘पंचायत’ मालिकेद्वारे आम्ही हे दाखवू शकलो की स्त्रिया इच्छाशक्तीने नेतृत्व करू शकतात.''

‘पंचायत’मधील मंजू देवीच्या भूमिकेसाठी अशी झाली निवड

'पंचायत'साठी दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा मंजू देवीच्या भूमिकेसाठी हिरोईनच्या शोधात होते. मग नीना गुप्ता यांनी ऑडिशन दिली. त्यांचा लूक मंजू देवीच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट बसला. आणि या भूमिकेसाठी नीना यांची फायनल निवड करण्यात आली. मिश्रा यांनी स्क्रिन लूक टेस्ट केल्यानंतर नीना गुप्तांचा लूक आणि त्यांनी दिलेल्या ऑडिशन पहून गावच्या सरपंचाची पत्नी असलेली भूमिका त्या सहजतेने साकारू शकतील, असे त्यांना वाटले होते.

नीना गुप्ता यांचे आगामी प्रोजेक्ट्स

नीना गुप्ता अनुराग बासूंच्या आगामी चित्रपटात ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. हा चित्रपट 'लाइफ इन अ... मेट्रो'चा स्पिरीच्युअल सिक्वल मानला जात आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, जलक ठक्कर, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी आणि अनुपम खेर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट ४ जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Neena Gupta shared glam photo on her birthday

'बिस्कीट ब्रा' लूकमुळे चर्चेत आल्या होत्या नीना गुप्ता

४ जून रोजी नीना यांनी आपल्या ६६ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला, ज्यामुळे त्यांच्या लूकची चर्चा झाली होती. नीना यांनी वाढदिवसाला ‘बिस्किट ब्रा’ आणि व्हाईट काफ्तानमध्ये फोटो शेअर केला होता, जो त्यांची मुलगी मसाबाने डिझाईनमधून केला होता. फ्लोईंग व्हाईट ‘रण काफ्तान’ आणि ‘बिस्किट ब्रा’मध्ये त्या झळकल्या होत्या. ही इन्स्टाग्राम पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. चाहत्यांनी या लूकचं प्रचंड कौतुक केलं असून, काहींनी याला "स्टनिंग लूक" म्हटलं, तर काहींनी असेही म्हटलं की, "हा लूक महिलांनी कोणत्याही वयात आपली स्टाईल कशी मांडावी, याची परिभाषा बदलू शकतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT