Ravi Kishan Viral Video: भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरलं त्यांचं एक वाक्य. “Work From Home” म्हणायचं असताना त्यांनी चुकून “Home From Work” असा उल्लेख केला आणि त्याचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या संपूर्ण प्रकारावर स्वतः रवी किशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी सारखं व्हायरल का होतोय, मला माहिती नाही”
व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर बोलताना रवी किशन यांनी मिश्कील शैलीत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “महादेवाची शपथ, मी वारंवार का व्हायरल होतोय, हे मला अजिबात समजत नाही. चुकून माझ्या तोंडून ‘Home From Work’ आणि ‘जल्दी द लेट’ असे शब्द निघाले.” ते पुढे म्हणाले की, त्यांना “Work From Home” म्हणायचं होतं, पण चुकून “Home From Work” असं बोललं गेलं.
“लोक माझ्याकडे अशा नजरेने बघतात जणू मी दुसऱ्या ग्रहावरून आलोय. मीही एक सामान्य माणूस आहे. माझ्याकडूनही चुका होतात. मग मला इतकं व्हायरल का केलं जातं, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे,” असं ते म्हणाले.
वादाची सुरुवात कशी झाली?
पश्चिम आशियातील तणाव, इंधन दरवाढीची शक्यता आणि संसाधनांचा वापर कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या कथित आवाहनावर बोलताना रवी किशन पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी लोकांनी शक्य असेल तिथे “Work From Home” स्वीकारावं, असा संदेश देताना त्यांनी चुकून “Home From Work” असा शब्दप्रयोग केला. व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसले की, “Home From Work खूप महत्त्वाचं आहे. जर ऑफिसचं काम घरून होऊ शकत असेल तर बाहेर जाणं टाळा.”
यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला आणि #HomeFromWork ट्रेंड होऊ लागला.
पक्षातही होतेय चर्चा
रवी किशन यांनी सांगितलं की, त्यांच्या व्हायरल क्लिप्सची चर्चा आता पक्षातही होते. “माझ्या पक्षातील लोकही मला विचारतात की, नेमकं तुम्ही काय करता? वरिष्ठ नेते विचारतात आणि मी म्हणतो, मलाच माहिती नाही,” असं त्यांनी हसत सांगितलं.