Marathi movie hindu hriday samrajni mata ahilyadevi
मुंबई - प्रत्येक मराठी ह्रदयाला गर्व असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन प्रवास लवकरच नव्या कोऱ्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत "हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी" हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
स्वप्नील मुनोत प्रॉडक्शन आणि ओझोन एंटरटेनमेंट निर्मित "हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. धर्मभेद, जातीभेद, वर्णभेद मोडून काढणाऱ्या या राजमातेचा प्रवास मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत लेखक आणि दिग्दर्शक यांच्या नजरेतून समोर येणार आहे. स्वप्नील संजय मुनोत आणि धनंजय कृष्णा जाधव आणि चित्रपट निर्मिती संस्था अ.नगर फिल्म कंपनी गेल्या दोन वर्षांपासून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर एक चित्रपट साकारण्यासाठी अथक परिश्रम घेत आहोत. जयकुमार मुनोत, अमोल खोले यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट आहे.
अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. त्यांची न्यायप्रियता, लोककल्याणकारी धोरणे आणि समाजसेवेची भावना आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात या त्यांच्या जीवनगाथेला मोठ्या पडद्यावर आणणे, हा आमचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याद्वारे त्यांच्या महान कार्याची माहिती आजच्या पिढीला आणि जगाला करुन देता येईल", असं मत निर्मात्यांनी मांडलं आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये मराठी मातीतलं भगवं वादळ म्हणजेच "हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी" हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. तर मराठीसह हा चित्रपट अन्य सहा भाषांमध्येही पाहता येणार आहे.