Hanuman Ansh Gaiety Galaxy Theatre Pudhari
मनोरंजन

Hanuman Ansh Controversy: 'हनुमान अंश' चित्रपटावरुन मुंबईत राडा; पोलिसांनी थेट थिएटरलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?

Hanuman Ansh Gaiety Galaxy Theatre: 'हनुमान अंश'चा शो न दाखवल्यामुळे मुंबईतील गेयटी गॅलेक्सी थिएटरमध्ये गोंधळ झाल्याची चर्चा आहे.

Rahul Shelke

Hanuman Ansh Gaiety Galaxy Theatre: मुंबईतील प्रसिद्ध गेयटी गॅलेक्सी थिएटर सध्या चर्चेत आलं आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' या चित्रपटाचा शो न दाखवल्यामुळे काही जणांनी थिएटरमध्ये गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी थिएटर बंद केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, थिएटर बंद होण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

'हनुमान अंश'चा शो न मिळाल्याने गोंधळ?

नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेला असला तरी अनेक ठिकाणी त्याचे शो हाऊसफुल्ल होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील बांद्रा येथील गेयटी गॅलेक्सी थिएटरमध्ये 'हनुमान अंश'चा शो न दाखवल्यामुळे काही लोकांनी विरोध केल्याची माहिती आहे. यावेळी थिएटर परिसरात गोंधळ घालण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

तसेच थिएटरमध्ये लावण्यात आलेल्या 'मिर्झापूर: द मूव्ही'च्या पोस्टर्सची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर थिएटरमध्ये पोलिस पोहोचले. मात्र, पोलिसांच्या तपासात थिएटर बंद करण्यामागे वेगळंच कारण असल्याचं स्पष्ट झालं.

थिएटर बंद करण्यामागे 'लायसन्स'चा मुद्दा

पोलिसांनी केलेल्या तपासात गेयटी गॅलेक्सी थिएटरने 2021-22 पासून आपला परवाना (लायसन्स) रिन्यू केलेला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे थिएटरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि पोलिसांनी थिएटर बंद करण्याची कारवाई केली.

पोलिसांनी थिएटरवर नोटीसही लावली असून, लायसन्सचा प्रश्न सुटेपर्यंत थिएटर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, लायसन्स रिन्यू झाल्यानंतर थिएटर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

'मराठा मंदिर'च्या मॅनेजरने दिली माहिती

गेयटी गॅलेक्सी आणि मुंबईतील प्रसिद्ध मराठा मंदिर या दोन्ही सिनेमागृहांचं व्यवस्थापन एकाच संस्थेकडे आहे. मराठा मंदिरचे मॅनेजर मनोज पांडे यांनी लायसन्सशी संबंधित काही अंतर्गत अडचणी असल्याची माहिती दिली आहे. हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुरू असून, थिएटरमधील शो पुन्हा सुरू केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका

दरम्यान, थिएटर बंद होण्यामागे 'हनुमान अंश'च्या स्क्रीनिंगदरम्यान झालेला गोंधळ कारणीभूत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. काही पोस्टमध्ये तर थिएटरमधील केबल जळाल्याचा आणि त्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

मात्र, थिएटर व्यवस्थापनाने या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. मनोज पांडे यांनी सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. थिएटरमध्ये काही अंतर्गत समस्या असून त्या सोडवण्याचं काम सुरू आहे. लवकरच सिनेमाचे शो पुन्हा सुरू करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे 'हनुमान अंश'चा शो हटवल्यामुळे गेयटी गॅलेक्सी थिएटर बंद करण्यात आलं, अशी सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. थिएटर बंद होण्यामागे मुख्य कारण लायसन्सशी संबंधित मुद्दा असल्याचं समोर आलं आहे.

'हनुमान अंश'ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

दरम्यान, 'हनुमान अंश' चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील भजने, कथानक आणि साध्या मांडणीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडल्याचं पाहायला मिळत आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतरही चित्रपटाच्या शोना मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT