धुरंधर, एनिमल, छावा, दंगल, पठाण... सगळे चारही मुंड्या चीत! ‘हनुमान अंश’ने अशी दिली धोबीपछाड file photo
मनोरंजन

Hanuman Ansh : धुरंधर, एनिमल, छावा, दंगल, पठाण... सगळे चारही मुंड्या चीत! ‘हनुमान अंश’ने अशी दिली धोबीपछाड

अवघ्या २ कोटी बजेटच्या हनुमान अंशसमोर बिग बजेट चित्रपटांची धुळदाण..

पुढारी वृत्तसेवा

hanuman ansh bollywood most profitable film ever leaving dhurandhar chhaava behind

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठ्या चित्रपटांचा विचार केला, तर दंगल, धुरंधर, एनिमल, पठाण यांसारख्या चित्रपटांची नावे आवर्जून घेतली जातील. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने या सर्व चित्रपटांना चक्क मागे टाकले आहे.

चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसचे गणित अत्यंत रंजक असते. एखाद्या चित्रपटाने किती कमाई केली, त्याची कामगिरी कशी राहिली, हे प्रामुख्याने बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवरून ठरवले जाते. एखाद्या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा कमी कमाई केली, तर तो फ्लॉप ठरतो. बजेटएवढी कमाई केली, तर सरासरी कामगिरी मानली जाते. तर बजेटपेक्षा अधिक कमाई झाल्यास हिट, सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर असे टॅग मिळतात. चित्रपटाची कथा कितीही चांगली असली, तरी बॉक्स ऑफिसवरील कमाईला विशेष महत्त्व असते.

हिंदी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

बॉलिवूडमध्ये गेल्या १० वर्षांत एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

यामध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या चित्रपटाने जगभरात २००० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत हिंदी सिनेमातील पहिला मोठा विक्रम नोंदवला.

यानंतर बॉलिवूडला पुन्हा अशी कामगिरी करण्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २०२३ मध्ये शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्यानंतर काही महिन्यांतच शाहरुखच्या ‘जवान’नेही बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांची कमाई केली.

रणबीर कपूरच्या ‘एनिमल’ चित्रपटानेही ९०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला. तर २०२५ हे वर्ष हिंदी सिनेमासाठी आणखी खास ठरले. विकी कौशलच्या ‘छावा’ने ७०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. मोहित सुरीच्या रोमँटिक ‘सैयारा’ या चित्रपटानेही जवळपास ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

मात्र, वर्षाच्या अखेरीस ‘धुरंधर’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर द रिव्हेंज’ प्रदर्शित झाला आणि त्याने तर आणखी मोठा विक्रम केला. या चित्रपटाने तब्बल १८०० कोटी रुपयांची कमाई करत बॉलिवूडमधील दुसऱ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम नोंदवला.

‘हनुमान अंश’ने सगळ्यांना कसे मागे टाकले?

या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मात्र, नुकत्याच आलेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने या सर्व चित्रपटांना एका वेगळ्याच बाबतीत मागे टाकले आहे.

या चित्रपटाची कमाई ४००-५०० कोटी किंवा १०००-२००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली नाही. तरीदेखील नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट हिंदी सिनेमातील सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक नफा मिळवणारा चित्रपट ठरला आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या चित्रपटाचे अत्यंत कमी बजेट.

‘हनुमान अंश’चे बजेट अवघे २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक मोठे चित्रपट केवळ मार्केटिंगसाठी किंवा कलाकारांच्या मानधनासाठी यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम खर्च करतात.

याउलट धुरंधर, एनिमल, पठाण, छावा, दंगल आणि सैयारा यांसारख्या चित्रपटांचे बजेट ५० कोटी रुपयांपासून ते जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

२ कोटींच्या बजेटमध्ये २८० कोटींची कमाई!

‘धुरंधर’चे बजेट जर २५० कोटी रुपये मानले, तर या चित्रपटाने एकूण सुमारे ३००० कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच चित्रपटाने आपल्या बजेटच्या तब्बल १२ पट व्यवसाय केला.

तर हिंदी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असलेल्या ‘दंगल’चे बजेट जवळपास ८०-९० कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जगभरात सुमारे २००० कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच ‘दंगल’ने आपल्या बजेटच्या २५ पटांहून अधिक कमाई केली.

मात्र, ‘हनुमान अंश’ची कामगिरी यापेक्षाही भन्नाट आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल २८० कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला जात आहे.

म्हणजेच या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तब्बल १४० पट अधिक कमाई केली आहे. ‘हनुमान अंश’ने हे दाखवून दिले आहे की, तुमच्याकडे चांगली कथा, खरी श्रद्धा आणि योग्य भावना असेल, तर मोठे बजेट नसतानाही एखादा छोटासा चित्रपट मोठमोठ्या सिनेमांना मागे टाकू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT