Gunmaaster G9 Movie Review Pudhari
मनोरंजन

Gunmaaster G9 Review: इमरान हाश्मीचा दमदार अंदाज, जेनेलियाचीही लक्षवेधी भूमिका; कसा आहे ‘गनमास्टर G9’?

Gunmaaster G9 Movie Review: इमरान हाश्मीचा दमदार अभिनय, जेनेलिया देशमुखची भूमिका आणि दुसऱ्या भागातील रंजक घडामोडी चित्रपटाची जमेची बाजू आहे.

Rahul Shelke

Gunmaaster G9 Movie Review: इमरान हाश्मीचा बहुचर्चित ‘गनमास्टर G9’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अ‍ॅक्शन, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेल्या या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. विशेष म्हणजे इमरान हाश्मी आणि संगीतकार हिमेश रेशमिया ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

त्यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. आता हा चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करतो का? इमरान हाश्मीचा अभिनय कसा आहे? जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना यांनी आपल्या भूमिकांना किती न्याय दिला आहे? जाणून घेऊया

चित्रपटाची कथा काय आहे?

‘गनमास्टर G9’ची कथा ईश्वर (इमरान हाश्मी) या व्यक्तीभोवती फिरते. ईश्वर एकेकाळी अंडरवर्ल्डच्या जगातील अत्यंत धोकादायक व्यक्ती असतो. मात्र, गुन्हेगारी आणि हिंसाचाराने भरलेलं आयुष्य मागे सोडून तो आता शांत जीवन जगत असतो. तो डेअरी फार्म चालवत असतो. पत्नी आरती (जेनेलिया देशमुख) आणि मुलगी जिया (इनायत वर्मा) यांच्यासोबत तो सुखी असतो.

मात्र, गुन्हेगारी जगताचा भूतकाळ इतक्या सहजासहजी पाठ सोडत नाही. एका सिंडिकेटकडून त्याच्या कुटुंबाला लक्ष्य केले जाते. त्यामुळे ईश्वरवर पुन्हा एकदा शस्त्र उचलण्याची वेळ येते.

पत्नी आणि मुलगी हेच आपले संपूर्ण जग असल्याचे ईश्वर सांगतो. त्यांच्या वाटेला कोणी गेले, तर त्याचे संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्याची ताकद आपल्यात आहे, असा इशाराही तो देतो. यानंतर सुरू होतो अ‍ॅक्शन, सूड आणि भावनांचा खेळ. कुटुंबाला वाचवण्यासाठी ईश्वर कोणत्या थराला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कलाकारांचा अभिनय कसा आहे?

इमरान हाश्मीने ईश्वरची भूमिका उत्तम साकारली आहे. त्याचा रफ अँड टफ लूक, देहबोली आणि संवादफेक लक्ष वेधून घेतात. अ‍ॅक्शन दृश्यांमध्ये तो आपल्या नेहमीच्या अंदाजात दिसतो. मात्र, या चित्रपटात तो केवळ अ‍ॅक्शन हिरो म्हणून समोर येत नाही. मुलीवर प्रेम करणारा आणि कुटुंबासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाणारा बापही त्याने प्रभावीपणे उभा केला आहे. भावनिक प्रसंगांमध्येही त्याचा अभिनय चांगला आहे.

इनायत वर्माने जियाच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी तिच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतात. त्यामुळे तिची भूमिका कथेसाठी महत्त्वाची ठरते.

जेनेलिया देशमुखने आरतीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. इमरान हाश्मीसोबत तिची केमिस्ट्री छान जमली आहे. विशेषतः क्लायमॅक्समधील तिचा अभिनय लक्षात राहतो.

अपारशक्ती खुराना देसू नावाच्या मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसतो. या भूमिकेतून त्याने आपली वेगळीच स्क्रीन इमेज प्रेक्षकांसमोर आणली आहे.

दिग्दर्शन कसे आहे?

आदित्य दत्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी कथा पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने मांडली आहे. अ‍ॅक्शन, कौटुंबिक भावना आणि थरार यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. हरिद्वारमधील दृश्ये आणि काही प्रसंग प्रभावी वाटतात, तर काही ठिकाणी कथानकाची गती कमी झाल्याचे जाणवते.

संगीताची जादू कमी पडली?

हिमेश रेशमिया यांच्या संगीताकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपटाचे संगीत पाहिजे तेवढे चांगले झाले नाही. ‘अफसाना बनाया आपने’ हे गाणे प्रभावी वाटते. मात्र, इतर गाणी चित्रपट संपल्यानंतर फारशी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे संगीताच्या बाबतीत चित्रपट थोडा निराश करतो.

चित्रपटातील कमतरता काय?

चित्रपटाचा पहिला भाग काहीसा संथ वाटतो. सुरुवातीला कथा रंजक होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मात्र, दुसऱ्या भागात कथेला वेग येतो आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढते.

अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये जे पाहायला मिळते, त्यापेक्षा ‘गनमास्टर G9’मध्ये फारसे वेगळे काही नाही. चित्रपटाची कथा भावनिक असली, तरी तिची मांडणी काहीशी जुनी वाटते. कथा ऐकताना चांगली वाटते; मात्र पडद्यावर ती आणखी प्रभावी पद्धतीने साकारता आली असती. काही प्रसंग अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज होती.

‘गनमास्टर G9’ का पाहावा?

तुम्ही इमरान हाश्मीचे चाहते असाल, तर हा चित्रपट नक्कीच पाहू शकता. त्याचा दमदार अंदाज, अ‍ॅक्शन आणि भावनिक अभिनय चित्रपटाची जमेची बाजू आहे. विशेषतः कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या बापाची भूमिका त्याने चांगली साकारली आहे.

तुम्हाला अ‍ॅक्शन आणि थरार चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा चित्रपट एकदा पाहण्यास हरकत नाही. मात्र, अगदी वेगळी कथा किंवा काहीतरी नवीन अनुभव मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका.

चित्रपटाचे रेटिंग - ⭐⭐⭐

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT