Geeta Tandon
मुंबई: स्टंट डायरेक्टर गीता टंडन यांनी ‘इंडिया के टॉप १%’ या रिॲलिटी शोच्या प्रॉडक्शन टीमवर गंभीर आरोप केले आहेत. शोच्या सेटवर कोणतीही पूर्वकल्पना न देता तब्बल ९ तास ताटकळत ठेवल्याचा आणि मानहानीकारक वागणूक दिल्याचा प्रकार त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सांगितला आहे. या प्रकरणानंतर शोचा सूत्रसंचालक अभिनेता अनिल कपूर आणि दिग्दर्शिका फराह खान यांनी गीता टंडन यांची जाहीर माफी मागितली आहे.
गेल्या दोन दशकांपासून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या गीता टंडन यांना त्यांच्या मुलासह ‘इंडिया के टॉप १%’ या शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. शोच्या टीमने वारंवार विनंती केल्यामुळे आणि या शोमुळे उत्तम प्रसिद्धी मिळेल या आशेने, कोणतीही फी किंवा मानधन न घेता त्या सहभागी होण्यास तयार झाल्या. यासाठी त्यांनी आपल्या मुलाला विशेषतः गोव्याहून मुंबईत बोलावून घेतले होते.
दुपारी १२:३० वाजता सेटवर पोहोचल्यानंतर काही तासांतच शूटिंग होईल, असे गीता यांना सांगण्यात आले. मात्र, त्यांना आणि त्यांच्या मुलाला एका तंबूत बसवून ठेवण्यात आले. किती वेळ वाट पाहावी लागेल, याबाबत प्रॉडक्शन टीमकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. वेळोवेळी चौकशी करूनही योग्य उत्तर न मिळाल्याने आणि वेळेचा अनादर झाल्याने गीता टंडन अत्यंत संतप्त झाल्या.
अखेर ९ तास वाट पाहिल्यानंतर गीता टंडन यांनी प्रॉडक्शन टीमला जाब विचारला. "विनामानधन येण्यास तयार झालो म्हणजे आमच्या वेळेची आणि आत्मसन्मानाची काहीच किंमत नाही का?" असा सवाल त्यांनी केला. यावर माफी मागण्याऐवजी प्रॉडक्शन मॅनेजर जयदीप याने, "त्यांना जायचे असेल तर जाऊ द्या, पण सही केल्याशिवाय ते जाऊ शकत नाहीत," अशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप गीता यांनी केला. या अपमानास्पद प्रकारानंतर त्या रात्री ९:१५ च्या सुमारास मुलासह सेटवरून निघून गेल्या.
गीता टंडन यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून अनिल कपूर, फराह खान आणि प्रॉडक्शन हाऊस ‘बनिजय आशिया’ला टॅग करत हा सर्व प्रकार समोर आणला. यावर प्रतिक्रिया देताना अनिल कपूर म्हणाले, "गीताजी, हे ऐकून मला खरोखरच खूप वाईट वाटले. तुम्ही आणि तुमचा मुलगा आमच्याकडे पाहुणे म्हणून आला होतात. तुम्हाला असा अनुभव आला, त्याबद्दल मी दिलगीर आहे. या शोचा सूत्रसंचालक म्हणून सर्व कलाकारांना आदर मिळावा हीच माझी नेहमी इच्छा असते. इंडस्ट्रीत इतकी वर्षे काम केल्यामुळे प्रतिष्ठा आणि आदराचे महत्त्व मला चांगले ठाऊक आहे. कोणालाही असे वाटू नये की त्यांच्याशी आदराने वागले गेले नाही. मी तुमच्या अभिप्रायाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि तो मांडल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो."
तर दिग्दर्शिका फराह खान यांनी म्हटले की, "तुम्ही सेटवर आला आहात याची मला अजिबात कल्पना नव्हती. जर मला किंवा अनिलला हे माहीत असते, तर आम्ही तुम्हाला आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसवले असते. तुमच्या कष्टाबद्दल आणि कामाबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे." यासोबत त्यांनी हात जोडलेले इमोजीही वापरले. गीता यांनी फराह यांच्या कमेंटलाही उत्तर दिले आणि या विषयाची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
"पडद्यामागे काम करणारे स्टंट आर्टिस्ट, ज्युनिअर आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि बॅकग्राउंड आर्टिस्ट यांना नेहमीच कमी लेखले जाते. प्रसिद्धी किंवा सेलिब्रिटी स्टेटसवरून कोणाला मिळणारा आदर ठरवला जाऊ नये. कलाकाराच्या वेळेचा आणि श्रमाचा योग्य आदर झालाच पाहिजे," असे मत मांडत त्यांनी हा लढा केवळ स्वतःसाठी नसून सर्व पडद्यामागील कलाकारांसाठी असल्याचे स्पष्ट केले.