औद्योगिक क्रांतीनंतर स्थलांतर हा भारतीय जीवनमानातील आवश्यक भाग झाला आहे. त्यातच बदलत्या निसर्गचक्राने शेतीची दुरावस्था झाल्याने केवळ कोकणातीलच नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील घरटी माणूस मुंबई, पुण्यात स्थिरावला.
आज पन्नाशी-साठी आणि सत्तरीत्तला प्रत्येक माणसांचे मूळ गावात आहे. पण शहरांची हवा लागलेल्या आजच्या पन्नाशी-चाळीशीतल्या पिढीला गावच्या मुळांची ओढ असली तरी रोजी-रोटीच्या वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना उठसुट गावाकडे पळता येत नाही, गाव आणि शहरांमधल्या दोन पिढ्यातल्या गावच्या ओढीच्या मानसिक, भावनिक विचारांच्या गुंतागुंतीचा हा संवेदनशील प्रवास म्हणजे गमन.
गमन म्हणजे प्रवासच. हा प्रवास हा रोजीरोटीसाठी शहरात आला तरी तो प्रत्येक चाकरमानाच्या आहे. दिग्दर्शक मनोज नाईकसाटम यांनी कोकणातील जुन्या आणि नव्या पिढीचे गाव आणि शहर या ओढीतील द्वंद अतिशय संयमितरित्या गमन द्वारे साकारले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धारगावचे भाऊ मालवणकर (नारायण जाधव) तब्येतीच्या कारणास्तव शहरात मुलाकडे वास्तव्याला आले आहेत. डॉक्टरांनी त्यांची तब्येत आता व्यवस्थित असल्याचे सांगताच भाऊंना गावची ओढ लागली आहे.
त्यातच महिन्यावर आल्यावर गणपतीच्या तयारीला जाण्यासाठी आणि ती तयारी व्यवस्थित कशी होईल, या विंवचनेत भाऊ आणि त्यांची पत्नी माई (श्रध्दा खानोलकर) आहे. अशातच त्यांच्या मुलाकडे काम करणारा कुंदन आणि त्याची बहीण यांना भाऊ आणि माईच्या मदतीला गावी पाठवले जाते.
कोकणातल्या मातीच्या ओढीची गोष्ट सांगतानाच दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी निसर्गाच्या आपत्तीमुळे गाव सोडणाऱ्या परप्रांतीयांच्या व्यथेची जोड या कथानकाला दिली आहे. कुंदनच्या गावाला आलेल्या पुराने त्याला आपली भूमी सोडावी लागली हे कळताच माई आणि भाऊच्या प्रेमाची उब कुंदन आणि त्याच्या बहिणीला मिळते.
गावच्या गणपती पुरती मुले - सुना - नातवंडे चार दिवस येऊन राहून जातात.. पुन्हा घरं सुनी होतात... पण घर केवळ तेव्हाच सुनी होतात असं नाही तर प्रत्येक सणावाराला एकेकाळी गोकुळासारखी नांदत्या घरांना कुलुपं लावण्याची व्यथा थरथरत्या हातांना पाहण्याची सवय नाही, त्यामुळे ते मुलांच्या वाटेकडे आस लावून बसतात, अशा गावात नांदणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांची बोलकी, हळवी आणि बोध घेणारी सुरेख कथा चित्रपटात गुंफण्यात आली आहे.
कोणी कुणाला आयुष्यभर पुरत नाही, हा माईंचा मनातला खंबीर विचार आणि काही झाले तरी आपल्या मातीला विसरायचं नाही हा भाऊंची गावाप्रतीची आंतरिक ओढीचा हा प्रवास सांगण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावच्या आणि मुलांच्या ओढीने अस्वस्थ असलेले आणि मुलांची गावाची ओढ कमी होत असल्याने वडील म्हणून होणारी तगमग आणि कोकणातील एक कुटुंबप्रमुख नारायण जाधव यांनी चांगले साकारले आहेत.
मुले आणि वडील यांच्या नात्यात समतोल ठेवणारी श्रध्दा खानोलकर यांची माईही लक्षात राहते. आई-वडिलांना कोकणाची भाषा शहरात राहणाऱ्या एकाही मुलाच्या तोंडी नाही, सगळेच प्रमाण भाषेत बोलतात हे मात्र खटकते. बाकी सर्व कलाकारांच्या भूमिका ठीक. रोजी - रोटीसाठी शहरात आलेल्या आणि मनात गावची ओढ असलेल्या प्रत्येक चाकरमान्याने पाहावा असा हा प्रवास आहे.