देशाची पहिली फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो काळाच्या पडद्याआड गेल्याने सौंदर्यविश्वात शोककळा पसरली आहे. भारतीय सौंदर्यस्पर्धांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या मेहर कॅस्टेलिनो यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
Meher Castelino Death
पहिली फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची पुष्टी फेमिना मिस इंडिया ऑर्गनायजेशनच्या इन्स्टाग्राम पेजवरून करण्यात आलीय. मिस इंडिया वर्ल्ड २०२५ नंदिनी गुप्ताने देखील पोस्ट लिहून श्रद्धांजली दिली आहे.
देशाची पहिली फेमिना मिस इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहर कॅस्टेलिनो यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने एक ऐतिहासिक पर्व संपले आहे. सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
मेहर कॅस्टेलिनो या फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्या काळात सौंदर्यस्पर्धांची संकल्पनाच नवीन असताना, त्यांनी आत्मविश्वास, सौंदर्याच्या जोरावर देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या यशामुळे भारतात फेमिना मिस इंडिया स्पर्धेला वेगळी ओळख मिळाली आणि पुढील पिढीतील अनेक तरुणींना प्रेरणा मिळाली. त्यांनी १९६४ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती.
त्याचा मृत्यू नेमका काशामुळे झाला, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, वृद्धापकाळाने त्यांना अनेक समस्या होत्या.
कॅस्टेलिनो यांच्याविषयीची एक पोस्ट मिस इंडिया ऑर्गेनायझरने केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिलंय- '१९६४ च्या फेमिना मिस इंडिया आणि पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाबद्दल आम्ही खूप दुःख व्यक्त करतो. त्यांनी नवीन मार्ग दाखवले, बेंचमार्क स्थापित केले आणि महिलांच्या पिढ्यांना निर्भयपणे स्वप्न पाहण्याचा पाया घातला. त्यांचा वारसा त्यांनी शक्य केलेल्या प्रवासातून आणि त्यांनी साकार केलेल्या स्वप्नांमधून जिवंत राहील.'
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच विविध क्षेत्रातील मान्यवर, फॅशन इंडस्ट्रीतील व्यक्ती आणि नेटकरी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.