टीव्ही इंडस्ट्रीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘निशा और उसके कजिन्स’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता विभु राघव याचे निधन झाले आहे. तो गेल्या काही वर्षांपासून स्टेज 4 कोलन कॅन्सरशी झुंज देत होता, पण अखेर त्याने या गंभीर आजारासमोर आपले प्राण गमावले.
2022 मध्ये विभुला कोलन कॅन्सरचे निदान झाले होते, आणि तेव्हापासून तो या रोगाशी खंबीरपणे लढत होता. विभु राघवने 'निशा और उसके कजिन्स', 'सावधान इंडिया' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याच्या अचानक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीतील सहकारी कलाकार, मित्रमंडळी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
विभु नेहमी सकारात्मक विचार करत होता आणि कॅन्सरशी झगडतानाही तो आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवून सोशल मीडियावर सक्रिय राहत असे. त्याने आपल्या आजाराविषयी अनेक व्हिडिओद्वारे लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याने 17 एप्रिल रोजी आपली शेवटची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्या पोस्टमधून त्याने आपल्या संघर्षाची झलक दाखवली होती. त्याची खास मैत्रीण सिंपल कौल आणि अभिनेत्री अदिती मलिक यांनी उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहनही सोशल मीडियावरून केले होते. त्याच्या मृत्यूनंतर सिंपल कौलने एक भावनिक पोस्ट शेअर करत नम्र श्रद्धांजली वाहिली आहे.
विभुची ही लढत, त्याची धैर्यशीलता आणि सकारात्मकता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. आज तो आपल्यात नसला तरी त्याचे आठवणी आणि त्याची जिद्दीची कहाणी नेहमी लोकांच्या मनात जिवंत राहील.