Fatima Bosch Wins Miss Universe 2025: मिस यूनिव्हर्स स्पर्धांमध्ये फक्त सौंदर्य पाहिलं जात नाही, तर व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि समाजासाठी काही करण्याची भावना देखील पाहिली जाते. मिस यूनिव्हर्स स्पर्धेत यंदा मेक्सिकोच्या फातिमा बॉशने विजेतेपद पटकावत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या 74व्या मिस यूनिव्हर्स स्पर्धेत शंभरहून अधिक देशांतील स्पर्धकांना मागे टाकत 26 वर्षांच्या फातिमाने हा मुकुट मिळवला.
फातिमा बॉशचा जन्म आणि वाढ मेक्सिकोमध्येच झाली. तिला लहानपणापासून मोठी स्वप्ने पाहायची आवड होती. तिने पत्रकारिता आणि कम्युनिकेशन यामध्ये पदवी मिळवली असून तिच्या बोलण्यात आणि विचारांत तिचा आत्मविश्वास दिसतो. तिचा स्वभाव स्पष्ट बोलणारा आहे. कोणत्याही विषयावर बिनधास्त मत मांडण्याची तिची शैली मेक्सिकोमध्येच नव्हे तर आता जगभर चर्चेत आहे.
फातिमा ही केवळ सौंदर्यस्पर्धांत चमकणारी मॉडेल नाही, तर ती समाजकार्यातही आघाडीवर आहे. लैंगिक समानता, महिलांचे हक्क आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांचे शिक्षण यासाठी ती सतत काम करते. तिचा विश्वास आहे की सौंदर्य तेव्हाच अर्थपूर्ण ठरतं, जेव्हा त्यातून समाजासाठी चांगलं काम घडतं.
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात मात्र वाद झाला होता. मिस मेक्सिको आणि थायलंड स्पर्धेच्या संचालकांमध्ये झालेल्या वादामुळे अनेक स्पर्धक नाराज होऊन मंच सोडून गेले होते. काही काळ फातिमाही त्यांच्यासोबत बाहेर गेली होती. पण नंतर तिने स्टेजवर परत येत आपल्या उत्तम कामाच्या बळावर ती मिस यूनिव्हर्स झाली. हा क्षण प्रेरणादायी होता.
भारताकडून या स्पर्धेत मनिका विश्वकर्मा सहभागी होती. भारतीयांसह जगभरातील प्रेक्षकांची नजर या स्पर्धेकडे होती. शेवटी, फातिमाने आपली बुद्धिमत्ता आणि परफॉर्मन्सच्या जोरावर मिस यूनिव्हर्सचे विजेतेपद पटकावले.