Javed Akhtar Farhan Akhtar Religion Pudhari
मनोरंजन

Javed Akhtar on Religion: लहानपणी फरहानने विचारलं, 'आपण मुस्लिम आहोत का?', जावेद अख्तरांचं उत्तर ऐकून व्हाल थक्क!

Javed Akhtar Farhan Akhtar Religion: जावेद अख्तर यांनी फरहान अख्तरच्या बालपणीचा एक खास किस्सा सांगितला आहे.

Rahul Shelke

Javed Akhtar Farhan Akhtar Religion: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते स्वतःला नास्तिक मानतात आणि धर्माबाबतचे आपले विचार अनेकदा मोकळेपणाने मांडताना दिसतात. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी मुलांच्या संगोपनात धर्माला दिलेल्या स्थानाबाबतचा एक खास प्रसंग सांगितला. हा किस्सा त्यांचा मुलगा फरहान अख्तर याच्याशी संबंधित आहे.

फरहानने वयाच्या ७ व्या वर्षी विचारला होता प्रश्न

जावेद अख्तर यांनी सांगितलं की, फरहान साधारण ७-८ वर्षांचा असताना एक दिवस शाळेतून घरी आला. खांद्यावर शाळेची बॅग असतानाही तो घाईघाईने वडिलांकडे आला. त्याला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं होतं.

फरहानने जावेद अख्तर यांना थेट विचारलं, “आपण मुस्लिम आहोत का?” फरहानच्या या प्रश्नामागे त्याला शाळेत किंवा मित्रांकडून मिळालेली माहिती असावी, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी मुलाला कोणत्याही धार्मिक चौकटीत बांधण्याऐवजी त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं.

‘तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे महत्त्वाचं’

जावेद अख्तर यांनी फरहानला समजावून सांगितलं की, एखादा मुलगा जन्माला येतो तेव्हा तो एखाद्या शहरात जन्माला येतो. उदाहरणार्थ, पुणे, मुंबई, आग्रा, अहमदाबाद, लंडन किंवा न्यूयॉर्क यांसारख्या कोणत्याही शहरात त्याचा जन्म होऊ शकतो.

मात्र, तुमचा जन्म कोणत्या शहरात किंवा कोणत्या समुदायात झाला, याला महत्त्व नाही. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, हेच सर्वात महत्त्वाचं आहे, असा संदेश त्यांनी मुलाला दिला.

फरहान आणि जोयाला धार्मिक ओळख दिली नाही

जावेद अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना फरहान आणि जोया अख्तरला लहानपणापासून कोणत्याही धर्माशी जोडले नाही. त्यांनी मुलांना स्वतःच्या धार्मिक ओळखीबाबत निर्णय घेण्यासाठी मोकळीक दिली.

जावेद अख्तर यांनी या मुलाखतीत आपल्या मुलांना ‘areligious’, म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेलं नसल्याचं वर्णन केलं. त्यांचं म्हणणं आहे की, मुलं मोठी होत असताना स्वतः धर्म आणि श्रद्धांबद्दल जाणून घेऊ शकतात; मात्र पालकांनी लहानपणीच त्यांच्यावर धार्मिक ओळख लादण्याची गरज नाही.

मुलांच्या यशाचा जावेद अख्तर यांना अभिमान

फरहान आणि जोया हे जावेद अख्तर आणि त्यांची पहिली पत्नी हनी ईरानी यांची मुलं आहेत. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

आपल्या दोन्ही मुलांच्या यशाबद्दल जावेद अख्तर यांनी अभिमान व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, फरहान आणि जोया यांनी स्वतःची ओळख आणि यश स्वतःच्या मेहनतीने निर्माण केलं. प्रसिद्धी, पैसा किंवा यश मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही.

धर्माच्या ओळखीपेक्षा माणूस म्हणून आपली ओळख महत्त्वाची आहे, हा जावेद अख्तर यांनी फरहानला दिलेला संदेश आजही महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT