Panchayat Cast Fees Pudhari
मनोरंजन

Panchayat Cast Fees: सीझननुसार मानधन वाढतं का? 'प्रल्हाद'नी उघड केलं वेबसीरिजचं 'आर्थिक गणित'

प्रत्येक सीझनवर मानधन वाढते या प्रश्नावर प्रल्हादच्या भूमिकेत असलेले फैसल मलीक यांनी खुलासा केला

अमृता चौगुले

सगळ्या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या वाढत्या प्रेमाचा अनुभव घेणारी सिरिज म्हणजे पंचायत. गावाच्या अतरंगी वातावरणात पुन्हा नेऊन पंचायतने प्रेक्षकांना कधी हसवले तर कधी रडवले. अलीकडेच या सिरिजचा चौथा सीझन येऊन गेला. ही सिरिज आतापर्यंत देशात सर्वात जास्त बघितली गेलेली सिरिज आहे. या सिरिजमधल्या प्रत्येक पात्राबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आहे. हे कलाकार कसे आहेत? त्यांची ऑफ स्क्रीन - ऑन स्क्रीन मैत्री कशी आहे? या कलाकारांची पार्श्वभूमी कशी आहे? तसेच प्रत्येक भागासाठी कलकारांना किती मानधन मिळते? अशी प्रत्येक बाब जाणून घेण्याची उत्सुकता असते.

मधल्या काळात पंचायतच्या कलाकारांना किती मानधन मिळते याबाबत समोर आले होते. पण आता प्रत्येक सीझनवर मानधन वाढते या प्रश्नावर प्रल्हादच्या भूमिकेत असलेले फैसल मलीक यांनी खुलासा केला आहे.

चौथ्या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन कुणाला?

चौथ्या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन सचिव जी म्हणजेच जितेंद्र कुमार यांनी घेतले होते. त्यांनंतर निना गुप्ता, रघुबीर यादव असे कलाकार आहेत. जितेंद्र यांना सत्तर हजार, निना गुप्ता 50 हजार तर रघुबीर यादव 40 हजार पर एपिसोड फी मिळत होती. तर फैसल मलीक आणि चंदन रॉय यांना प्रत्येक एपिसोड मागे 20 हजार इतके मानधन मिळायचे.

कशी असते प्रत्येक सीझनची पेमेंट पद्धत?

फैसल म्हणतात, 'पेमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही लोक प्रतिदिन या हिशोबाने पेमेंट करतात तर काही लोक एकदम सगळे पेमेंट देतात. तुम्ही त्या प्रोजेक्टवर किती काम करत आहात यावर त्याचे पेमेंट ठरवले जाते.’

पेमेंटचे पाच भागात होते विभाजन:

फैसल मलीक पुढे म्हणतात, ‘यानंतर मानधन हे हप्त्यात बदलले जाते. त्याचा काही भाग साईन करताना घेतला जातो. त्यानंतर काही भाग शूटिंगच्या मध्ये आणि काही शूटिंग संपल्यावर दिला जातो. यानंतर डबिंगनंतर काही भाग दिला जातो. तर शेवटचा भाग सिरिज रिलीज झाल्यानंतर दिया जातो. शेवटचा भाग मिळण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ लागू शकतो. जोवर शो रिलीज नाही होत तोपर्यंत पूर्ण मानधन मिळत नाही.

सिरिजच्या यशावर मानधनात वाढ होत नाही:

फैसल पुढे म्हणतात, की प्रत्येक सीझननंतर मानधन वाढवण्याचा क्लॉज करारात असेल तर आणि तरच मानधनात वाढ होते. अन्यथा सिरिज कितीही यशस्वी झाली तरी त्याचा परिणाम मानधनावर होत नाही. पंचायतचा पाचवा सीझन मेकर्सनी नुकताच जाहीर केला असून पुढच्या वर्षी पाचवा सीझन भेटीला येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT