emraan hashmis serial kisser image was part of a planned pr campaign reveals publicist
पुढारी ऑनलाईन :
अभिनेता इमरान हाश्मीला अनेक वर्षे ‘सिरियल किसर’ या टॅगमुळे ओळखले जात होते. मात्र, आता एका पब्लिसिस्टने खुलासा केला आहे की, ही प्रतिमा त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आखलेल्या मार्केटिंग रणनीतीचा भाग होती.
सोहा अली खानच्या All About Her या पॉडकास्टमध्ये बोलताना पीआर तज्ज्ञ परुल गोसाईन यांनी या कल्पनेमागील गोष्ट सांगितली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, इमरानला स्वतःला ही प्रतिमा फारशी आवडत नव्हती.
परुल म्हणाल्या, “इमरान हाश्मी या प्रतिमेमुळे खूप कंटाळला आहे. त्यानेच मला हे सांगण्याची परवानगी दिली आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “इमरानला पीआरमध्ये फारसा रस नव्हता. मला आठवतंय, महेश भट्ट म्हणाले होते की आता त्याच्यासाठी पीआर करायला हवा. मी त्यांना सांगितलं की इमरानच्या किसिंग सीनविषयीच्या बातम्या नेहमीच चर्चेत येतात. मग आपण अशी प्रतिमा का तयार करू नये की तो प्रत्येक चित्रपटात प्रत्येक अभिनेत्रीला किस करतो? त्यावर महेश भट्ट म्हणाले, ‘यात दम आहे.’”
परुल यांनी सांगितले की, सुरुवातीला इमरान या कल्पनेबाबत साशंक होता, कारण त्याला पत्नीची प्रतिक्रिया काय असेल याची चिंता होती.
“आम्ही इमरानला ही कल्पना सांगितली. त्यावर तो म्हणाला, ‘अरे, माझी पत्नी परवीन मला मारून टाकेल.’ मी त्याला सांगितलं की तिला घेऊन ये, मी तिच्याशी बोलते. शेवटी तो तयार झाला, कारण महेश भट्ट यांच्या विरोधात जाणं त्याला शक्य नव्हतं. मी परवीनला समजावलं की ही फक्त मार्केटिंग मोहीम आहे. इमरान प्रत्यक्षात या गोष्टीच्या विरोधात आहे. पण त्याच्यासोबत आमचे अनेक चित्रपट येणार होते आणि चर्चेत राहण्यासाठी काहीतरी वेगळी कथा हवी होती. विशेषतः बी आणि सी सेंटरमध्ये ही रणनीती प्रचंड यशस्वी ठरली,” असे परुल यांनी सांगितले.
‘मर्डर’नंतर मिळाली ‘सिरियल किसर’ची ओळख
इमरान हाश्मीने 2003 मध्ये Footpath चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र 2004 मध्ये आलेल्या Murder चित्रपटामुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबतचे त्याचे किसिंग सीन खूप चर्चेत आले. त्यानंतर सलग अनेक हिट चित्रपटांमुळे त्याला ‘सिरियल किसर’ हे टोपणनाव मिळाले.
विशेष म्हणजे, इमरानने स्वतःही यापूर्वी मान्य केले होते की तो आणि त्याची टीम त्या काळात या प्रतिमेचा प्रचार करण्यावर भर देत होते.
एका मुलाखतीत इमरान म्हणाला होता, “ते चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरत होते आणि मीही त्या प्रतिमेचा फायदा घेत होतो. मार्केटिंगद्वारे आम्ही ती प्रतिमा अधिक ठळक करत होतो. माध्यमांनाही त्याची पूर्ण कल्पना होती.”
प्रतिमा बदलण्याची गरज जाणवली
इमरानने पुढे सांगितले की, एका दशकानंतर त्याला स्वतःची प्रतिमा बदलण्याची गरज जाणवू लागली. तो म्हणाला, “प्रेक्षक काळानुसार बदलतात. दर 10 ते 14 वर्षांनी नवीन पिढी चित्रपटगृहात येते. त्या नव्या प्रेक्षकांसाठी स्वतःला नव्याने सादर करणे महत्त्वाचे असते. प्रत्येक प्रतिमा आणि व्यक्तिरेखा एका टप्प्यानंतर मर्यादेला पोहोचते. मी त्या प्रतिमेचा पूर्ण वापर केला होता. त्यामुळे बदल करणे आवश्यक होते.”
यानंतर Jannat, Awarapan आणि Shanghai सारख्या चित्रपटांमधून इमरानने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तरीही, आजही त्याला किसिंग सीनबाबत प्रश्न विचारले जातात. याबाबत तो हसत म्हणाला, “जेव्हा एखादी प्रतिमा इतकी मजबूत बनते, विशेषतः भारतासारख्या पारंपरिक समाजात, तेव्हा लोक ती सहज विसरत नाहीत. अलीकडील एका पत्रकार परिषदेतही मला पुन्हा किसिंग सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण भारतात लोक अजूनही त्या गोष्टीबद्दल उत्सुक आहेत.”