Drishyam 3 Box Office Collection Pudhari
मनोरंजन

Drishyam 3 Box Office: अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 10 बड्या चित्रपटांना टाकलं मागे; 4 दिवसांत किती कोटी कमावले?

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत अवघ्या चार दिवसांत जगभरात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Rahul Shelke

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केल्यानंतर आता कमाईचा वेग कायम ठेवला आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसांत दमदार कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी, म्हणजेच सोमवारीही चित्रपटाने चांगली कमाई केली. विशेष म्हणजे, चार दिवसांत ‘दृश्यम 3’ने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

पहिल्याच दिवशी 62 कोटींची कमाई

‘दृश्यम 3’ने पहिल्याच दिवशी तब्बल 62 कोटी रुपयांची कमाई केली. ही अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 53.50 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी कमाई पुन्हा वाढत 61 कोटी रुपयांवर पोहोचली.

मात्र सोमवार हा कामाचा दिवस असल्याने चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. तरीही चित्रपटाने सोमवारी भारतात सुमारे 21 कोटी रुपयांची नेट कमाई केली.

यानंतर ‘दृश्यम 3’ची भारतातील एकूण नेट कमाई 197.50 कोटी रुपये झाली आहे. सोमवारी चित्रपटाचे 16,274 शो झाले, तर प्रेक्षकांची ऑक्युपन्सी सुमारे 25 टक्के होती.

परदेशातही चित्रपटाची दमदार कमाई

‘दृश्यम 3’ला परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमधून सुमारे 5 कोटी रुपये कमावले. आतापर्यंत परदेशातील एकूण कमाई 66 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

चित्रपटाची जगभरातील ग्रॉस कमाई आता 303 कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘दृश्यम 3’चा समावेश झाला आहे.

सोमवारी चित्रपटाच्या कमाईत रविवारच्या तुलनेत मोठी घट झाली. रविवारी 61 कोटी रुपये कमावणाऱ्या चित्रपटाने सोमवारी 21 कोटींची कमाई केली. म्हणजेच कमाईत सुमारे 65 टक्क्यांची घट झाली. मात्र, कामकाजाचा दिवस असूनही 20 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले

सोमवारच्या कमाईच्या बाबतीतही ‘दृश्यम 3’ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाची पहिल्या सोमवारची कमाई 21 कोटी रुपये आहे.

याच यादीत ‘धूम 3’ने 20.91 कोटी, ‘टायगर 3’ने 20.50 कोटी, ‘ट्यूबलाइट’ने 19.09 कोटी, ‘जुडवा 2’ने 18 कोटी, ‘सिंघम अगेन’ने 18 कोटी आणि ‘भूल भुलैया 3’ने 18 कोटी रुपयांची कमाई केली होती.

याशिवाय ‘रुस्तम’ने 17.81 कोटी, ‘कबीर सिंह’ने 17.54 कोटी, ‘बॉडीगार्ड’ने 17.40 कोटी, ‘शिवाय’ने 17.35 कोटी आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने 17.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘दृश्यम’च्या दोन्ही भागांची कमाई किती?

‘दृश्यम’ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सस्पेन्स-थ्रिलर फ्रँचायझी आहे. पहिल्या ‘दृश्यम’ चित्रपटाने भारतात 67.14 कोटी रुपये नेट कमावले होते. जगभरातील त्याची कमाई 110.40 कोटी रुपये होती.

यानंतर आलेल्या ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. या चित्रपटाने भारतात 239.67 कोटी रुपये नेट, तर जगभरात 342.31 कोटी रुपये कमावले होते.

आता ‘दृश्यम 3’ने अवघ्या चार दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत चित्रपटाची कमाई कुठपर्यंत पोहोचते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT