Ranveer Singh Don 3 Controversy Pudhari
मनोरंजन

Ranveer Singh Controversy: फरहान-झोयाने रणवीर सिंगसोबत काम करण्यास दिला नकार? ‘डॉन 3’ वादात नवा ट्विस्ट

Ranveer Singh Don 3 Controversy: ‘डॉन 3’मधून रणवीर सिंग बाहेर पडल्यानंतर फरहान अख्तरसोबत त्याचे मतभेद वाढल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, रणवीरने संबंध सुधारण्यासाठी दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली होती.

पुढारी वृत्तसेवा

Ranveer Singh Don 3 Controversy: बॉलिवूडमध्ये ‘डॉन 3’ चित्रपटाभोवतीचा वाद आता आणखी गडद होताना दिसत आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यातील कथित मतभेद आता इतके वाढल्याची चर्चा आहे की, फरहान आणि त्याची बहीण झोया अख्तर पुन्हा रणवीरसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘डॉन 3’मधून रणवीर सिंग बाहेर पडल्यापासून दोघांमधील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे. शूटिंग सुरू होण्याच्या काही आठवडे आधी रणवीरने माघार घेतल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचंही सांगितलं जात आहे.

रणवीरने संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला?

रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगने कथित मतभेद मिटवण्यासाठी पुढाकार घेत फरहान अख्तर किंवा झोया अख्तरसोबत दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली होती. ‘गली बॉय’नंतर झोयासोबत पुन्हा काम करण्याची इच्छाही रणवीरने व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

मात्र, एका सूत्राच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला की, हा प्रस्ताव लगेच नाकारण्यात आला. इतकंच नाही, तर फरहान आणि झोया यांना रणवीरसोबत पुन्हा काम करण्यात रस नसल्याचाही दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

सलमान खानने घेतली मध्यस्थीची भूमिका?

या कथित वादात आता अभिनेता सलमान खानने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. काही रिपोर्टनुसार, सलमानने रणवीर आणि अख्तर कुटुंबीयांशी स्वतंत्रपणे संवाद साधत वाद शांततेत मिटवण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूडमधील एका सूत्राने दावा केला की, सलमान जवळचा असल्याने त्याने हा वाद वाढू न देता तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. फरहानला सर्जनशील मतभेद इंडस्ट्रीत सामान्य असल्याचं सांगण्यात आलं, तर रणवीरची बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

आमिर खानच्या बैठकीतही झाला होता प्रयत्न?

काही रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, यापूर्वी आमिर खानच्या घरीही हा वाद मिटवण्यासाठी बैठक झाली होती. मात्र, त्या चर्चेत फरहान अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी उपस्थित नसल्यामुळे तोडगा निघाला नाही, असं बोललं जात आहे. भविष्यातील कोणतीही चर्चा त्यांच्या उपस्थितीतच व्हावी, अशी त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे.

‘डॉन 3’मुळे आर्थिक नुकसान?

रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगने ‘डॉन 3’मधून अचानक बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांना सुमारे 45 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) कडून रणवीरविरोधात कथित “शॅडो बॅन”सारखी कारवाई झाल्याचाही दावा केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत रणवीर सिंग, फरहान अख्तर किंवा संबंधित टीमकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चांकडे रिपोर्ट्स आणि सूत्रांच्या दाव्यांच्या आधारेच पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT