पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याची प्रमुख प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'छावा' (Chhaava) चित्रपटातील काही दृश्यांवरुन वाद सुरु आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांना नृत्य करताना दाखवण्यात आले आहे. यावर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आक्षेप नोंदवला. हा चित्रपट जाणकारांना दाखवण्यात आल्याशिवाय तो प्रदर्शित करु नये, असे सामंत यांनी म्हटले. त्यानंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी, चित्रपटातील ती दृश्ये डिलीट करु, असे आश्वासन दिले आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी याबाबत आपण बोलून चर्चा केली. त्यांचाही काही दृश्यांवर आक्षेप आहे. त्यांच्या मतांशी मी सहमत असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. छावा सिनेमावर अन्याय होऊ देणार नाही. पण चित्रपटातील आक्षेपार्ह सीन डिलीट करावेत, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही दिग्दर्शकावर आक्षेप घेतलेला नाही. नजरचुकीने जर काही आक्षेपार्ह दृश्ये त्यात असतील तर ती डिलीट करावीत. त्यात बदल करावा, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
सामंत यांनी चित्रपटातील एका नृत्याच्या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनवणे ही आनंदाची गोष्ट आहे. पण या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याची अनेकांची मते आहेत. हा चित्रपट जाणकारांना दाखवण्यात आल्याशिवाय तो प्रदर्शित करु नये, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी आम्ही चार वर्षे रिसर्च केला. छत्रपती संभाजीराजे हे महान योद्धे, राजे होते हे जगाला कळावे हाच या चित्रपटीमागील उद्देश आहे. पण काही दृश्यांना गालबोट लावले जात असेल आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर ते डिलीट करायला हरकत नाही, असे लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले.
लेझीम हा पारंपरिक खेळ आहे. महाराज लेझीम खेळले नसतील का? असा आमचा प्रश्न आहे. महाराज लेझीम खेळले असतील असे आम्हाला वाटले, असे उतेकर म्हणाले.
हिंदीत बनवण्यात आलेला ‘छावा’ चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.