Dhurandhar 2 Box Office Collection: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पेड प्रिव्ह्यूपासूनच जोरदार सुरुवात झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी शंभरी पार करत इतिहास रचला होता, आणि आता दुसऱ्या दिवशीही कमाईचा वेग कायम आहे.
पहिल्या दिवशी 100 कोटींच्या आसपास कमाई करणाऱ्या या चित्रपटाने हिंदीतच जवळपास 99 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे ‘धुरंधर 2’ हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे, जवान सारख्या मोठ्या चित्रपटालाही हे साध्य करता आले नव्हते.
दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शननेही चित्रपटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर 2’ने दुसऱ्या दिवशी भारतात तब्बल 80.72 कोटी रुपये कमावले. यामुळे एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन 226 कोटींच्या पुढे गेले आहे, तर एकूण ग्रॉस कमाई 269 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.
या चित्रपटाला हिंदी प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदीत सर्वाधिक कमाई झाली असून नाईट शोमध्ये मोठी गर्दी दिसत आहे. मात्र, दक्षिण भारतात चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये कमाई तुलनेने कमी आहे.
दुसऱ्या दिवसाच्या कमाईत सुमारे 21 टक्क्यांची घट झाली असली, तरीही हा आकडा प्रचंड मोठा मानला जात आहे. कारण वीकेंड सुरू झाल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. पुष्पा 2 (93 कोटी), बाहुबली 2 (69 कोटी), KGF 2 (66.50 कोटी), जवान (53 कोटी), स्त्री 2 (45 कोटी), पठाण (51 कोटी), ॲनिमल 2 (53 कोटी), गदर 2 (43 कोटी), वॉर 2, सलार, कुली, टायगर 3 यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत धुरंधर 2 दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.
रणवीर सिंगसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण वीकडेजमध्येही ही कमाई टिकवून ठेवणे आणि दक्षिण भारतातही चांगला प्रतिसाद मिळवणे गरजेचे आहे. जर हे जमले, तर ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर आणखी मोठे विक्रम करू शकतो.
एकूणच, दोनच दिवसांत जवळपास 300 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेला ‘धुरंधर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे, आणि आगामी दिवसांत हा चित्रपट आणखी किती रेकॉर्ड मोडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.