Dharmveer Movie will release on 9 August
धर्मवीर - २ चित्रपट ऑगस्टमध्ये भेटीला येतोय Instagram
मनोरंजन

Dharmaveer-2 चा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला? प्रतीक्षेत राहा 'या' दिवशी येणार चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या "धर्मवीर - २" चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, बॉलीवूड स्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.

''धर्मवीर - २" हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी "धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. २०२२ ला "धर्मवीर" चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला.

या चित्रपटात एक डायलॉग आहे "कार्यकर्त्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो." प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम आहे, जी साकारणे तेवढे सोप्पे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही.

मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितीश दाते यांचे काम छान झाले आहे. पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा चित्रपट डबल हीट होईल अशा मी संपूर्ण टिमला शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला "धर्मवीर - २" ट्रेलर लॉन्च

'आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग ' या वाक्यापासून सुरू होणारा "धर्मवीर - २" चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला गुंतवून ठेवतो. सर्वसामान्यांमध्ये राहणारे, सर्वसामान्यांसाठी झटणारे, भगव्यासाठी आणि हिंदुत्त्वासाठी लढणारे दिघेसाहेब पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये दिसतात. 'तुझ्या आणि हिंदुत्त्वामध्ये मी जरी आलो, तरी मला बाजूला सारून हिंदुत्त्वाला मिठी मार' या दिघे साहेबांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉग ने तर अंगावर काटा उभा राहतो.

"धर्मवीर - २" चित्रपटात एकूण चार गाणी

"धर्मवीर - २" चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्वरबद्ध करण्यात आली आहेत. या चित्रपटातील "चला करू तयारी..." ह्या गीताने अल्पावधीतच रसिक श्रोत्यांची मने जिंकली असून लवकरच अन्य गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

SCROLL FOR NEXT