A. R. Rahman Faces Rs. 2 crore copyright Fine
नवी दिल्ली : बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय सिनेमातील अनोख्या श्रवणीय संगितातून तमाम भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावरच चक्क एका गाण्याची कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार रहमान यांना कॉपीराईट प्रकरणात 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तथापि, रहमान यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
दाक्षिणात्य कलावंतांचा भरणा असलेल्या पोन्नियिन सेल्वन 2 या चित्रपटातील गाण्याविषय़ीचे हे प्रकरण आहे. या चित्रपटात विक्रम, कार्ति, शशोभिता धुलिपला, ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटातील 'वीरा राजा वीरा' हे गाणे हूबेहुब दिवंगत ज्युनियर डागर बंधुंनी रचलेल्या 'शिव स्तुती' सारखेच असल्याचे आढळल्यानंतर, न्यायालयाने अंतरिम आदेशात रहमान यांना दोन कोटी रूपयांचा दंड ठोठावला.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी म्हटले की, या चित्रपटातील कथित वादग्रस्त गाणे केवळ ‘शिव स्तुती’वर आधारित किंवा प्रेरित नसून प्रत्यक्षात केवळ बोलांमध्ये बदल केले आहेत.
उर्वरित गाण्याची रचना हूबेहूब आहे. इतर घटक जोडल्याने कथित वादग्रस्त गाणे आधुनिक रचनेसारखे बनले असेल. मात्र, मूळ संगीत हुबेहुब आहे, असे न्यायालयाने म्हटले.
रहमान यांचे गाणे स्वर (सुर), भावना (भाव) आणि श्राव्य परिणाम (कानावर पडणारा प्रभाव) या सर्व दृष्टीकोनांनी 'शिव स्तुती' या मूळ रचनेसारखंच आहे. अगदी एका सामान्य श्रोत्याच्या दृष्टीनेही असे न्यायालयाने म्हटले आहे.
मूळ गाणे संगीतकार उस्ताद नासिर फैयाजुद्दीन डागर आणि उस्ताद नासिर जहिरुद्दीन डागर यांचे आहे. त्यांचे वारसदार उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या उत्तरात हा आदेश देण्यात आला.
सर्व ओटीटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, गाण्याच्या क्रेडिटमध्ये स्पष्टपणे "दिवंगत उस्ताद एन. फैयाजुद्दीन डागर आणि दिवंगत उस्ताद जहिरुद्दीन डागर यांनी लिहिलेल्या शिवस्तुतीवर आधारित रचना" असे नमूद करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
डागर यांच्या म्हणण्यानुसार, ‘शिव स्तुती’ ही रचना त्यांच्या वडिलांनी व काकांनी ज्यांना ज्युनियर डागर ब्रदर्स म्हणून ओळखले जात असे 1970 च्या दशकात तयार केली होती.
त्यांचा दावा आहे की, त्यांच्या वडिलांचा व काकांचा मृत्यू अनुक्रमे 1989 व 1994 साली झाल्यानंतर, त्या रचनेचे कॉपीराइट कुटुंबातील कायदेशीर वारसदारांमध्ये झालेल्या तोंडी (मौखिक) समजुतीनुसार त्यांच्या ताब्यात आले.
आरोप निराधार : रहमान
दरम्यान, ए. आर. रहमान यांनी कॉपीराईटचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. शिवाय, मद्रास टॉकीजच्या टीमनेही हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
ए. आर. रहमान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता आहेत. त्यांनी स्लमडॉग मिलियनेअर या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
त्यांचे संगीत भारतीय पारंपरिक आणि पाश्चात्य संगीत यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या संगितात आढळून येतो. "मोझार्ट ऑफ मद्रास" या टोपणनावानेही ते ओळखले जातात. त्यांचे संगीत आणि अनेक गाण्यांनी भारतीय लोकमानस व्यापून राहिले आहे.
ए. आर. रहमान यांच्यावर संगीत कॉपी केल्याचा थेट आरोप आढळून येत नाही. कारण रहमान स्वतः अत्यंत मौलिक, प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण संगीतकार म्हणून ओळखले जातात.
उलट, बॉलीवूडमध्ये येण्यापुर्वी त्यांनी दक्षिणेत केलेल्या काही चालींची कॉपी इतरांनी केली होती. तथापि, त्याची फार वाच्यता झाली नाही.
कधी कधी त्यांचे काही संगीत प्रेरित वाटू शकते. विशेषतः पारंपरिक भारतीय, सूफी किंवा जागतिक संगीतशैलींमधून त्यांचे संगीत प्रेरित असल्याचे वाटते तथापि ते थेट कॉपी नसते, तर सर्जनशील वापर असतो.
रहमान यांनी स्वतःही अनेकदा सांगितले आहे की, ते मूळ ध्वनींच्या शोधात सतत विविध संस्कृतींमधून प्रेरणा घेत असतात.