Nilu Phule Photo
निळू फुले यांचा १३ जुलैला स्मृतीदिन  gargi phule instagram
मनोरंजन

'निळू फुलेंना पाहताच बायका शिव्या शाप द्यायच्या'; पण खरा स्वभाव होता तरी कसा?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोलण्याची विशेष लकब, भारदस्त आवाज आणि अभिनयातील वेगळेपण अशा तिहेरी गुणांमुळे निळू फुलेंचं नाव अजरामर ठरलं. आजदेखील त्यांचं नाव उच्चारलं की, चेहऱ्यावर स्मित हास्य येऊन जातं. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका अशा ठरल्या की, त्यांना छोट्या पडद्यावर पाहिलं की, बायका बोटं मोडायच्या. कारण, एक कलाकार म्हणून त्यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या खलनायकी स्वरुपातील होत्या. राजकारण गेलं चुलीत, सूर्यास्त अशी नाटके तर चोरीचा मामला, बिनकामाचा नवरा, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापड्या, सामनान, पिंजरा, सिंहासन, एक गाव बारा भानगडी असे कितीतरी चित्रपट गाजले आणि त्या-त्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या.

कलाकार निळू फुले यांचा आज १३ जुलैला स्मृतिदिन आहे. रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहिजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची – कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही त्‍यांची प्रमुख लोकनाट्ये गाजली.

निळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला होता. त्‍यांचे वडील लोखंडी सामान व भाजीपाला विकत होते. त्‍यांचे दुकानही होते. निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.

निळू फुलेंची कन्या गार्गी काय म्हणते?

निळूभाऊंची खलनायक ही ओळख आहेच. पण, 'अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' अशी त्यांची ओळख आहे. एका कार्यक्रमात त्यांची कन्या गार्गी फुले यांनी आपले वडील पडद्यामागे कसे होते, याबद्दल सांगितले होते. शिवाय ती वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकत असते. आपल्या बाबांबद्दल भावना व्यक्त करत असते. पडद्यावरील खलनायक व पडद्यामागचा मोठा माणूस असे निळू फुले शांत स्वभावाचे, मोजके बोलणारे आणि प्रेमळ होते, असे गार्गी तिच्या वडिलांविषयी बोलते. ते खूप सारी पुस्तके वाचायचे, असे गार्गी फुलेने एकदा म्हटले होते.

निळू फुलेंना अभिनयाची आवड पहिल्‍यापासूनच होती. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्‍यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्‍यात पहिल्‍यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्‍यातून त्यांना प्रसिध्‍दी मिळाली. तर सुर्यास्त या नाटकामुळे ते अधिक लोकप्रिय झाले.

रंगभूमीवरून ते सिनेजगतात जाताना त्‍यांच्‍यातील कलाकाराने आपली विविध रूपे मराठी सिनेसृष्‍टीला दाखवली. त्‍यांनी 'एक गाव बारा भानगडी' चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्‍टीत पाऊल ठेवले.

निळूभाऊंचे मराठी चित्रपट

'सामना,' 'पिंजरा,' 'सोबती,' 'प्रतिकार,' 'पुत्रवती,' 'सहकार सम्राट,' 'शापीत,' 'हर्‍या नार्‍या,' 'पैज,' 'कळत नकळत,' 'जैत रे जैत,' 'पैजेचा विडा.'

निळूभाऊंचे हिंदी चित्रपट

इतकेच नाही तर निळू यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. 'जरासी जिंदगी,' 'रामनगरी,' 'नागीन-२,' 'मोहरे,' 'सारांश,' 'मशाल,' 'सूत्रधार,' वो सात दिन,' 'नरम गरम,' 'जखमी शेर,' 'कुली' आदी चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली. निळु फुले यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होता. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते.

'कुली' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर मशालमध्ये 'दिलीपकुमार'सोबतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. खर्‍या आयुष्यात मात्र ते समाजाला दिशा दाखवणारे नायकच होते. २००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली होती.

SCROLL FOR NEXT