पुढारी ऑनलाईन डेस्क : मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या विवाहाची चर्च जगभरात होत आहे. जस्टिन बिबर आणि रिहाना अशा आंतरराष्ट्रीय कलाकारांचे सादरीकरण, किम कार्डशिअनपासून ते जगभरातील दिग्गज राजकारणी, उद्योगपती, खेळाडू, कलाकार यांची उपस्थिती यामुळे हा विवाहसोहळा लक्षवेधी ठरला आहे. या विवाहावर अंबानी कुटुंबीयांनी जवळपास ५ हजार कोटी रुपये खर्च केले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम अगदीच किरकोळ आहे.
आऊटलूक या नियतकालिकाने हा लग्नावरील खर्चाबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. या विवाहसोहळ्यावर जवळपास ५ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर मुकेश अंबानी यांची नेटवर्थ १३२.२ अब्ज डॉलर म्हणजे १०,२८,५४४ कोटी इतकी आहे. म्हणजेच त्यांचा एकूण संपत्तीच्या ०.५ टक्के इतकी रक्कम या लग्नावर खर्च झालेली आहे.
या लग्नासाठी पहिले प्री-वेडिंग गुजरात येथील जामनगर येथे झाले, तर दुसरा भाग इटली ते फ्रान्स अशा लक्झरी क्रुझवर आयोजित करण्यात आला. तर लग्न १२ जुलैला मुंबईत नियोजित आहे. आऊटलूक या नियतकालिकाने NC Financial Advisory या संस्थेचे संस्थापक नितीन चौधरी यांच्या हवाल्याने लग्नाच्या खर्चाचा अंदाज वर्तवला आहे. चौधरी म्हणाले, "पण आपण नीट लक्ष दिले तर अंबानी यांच्यासाठी हा खर्च फार मोठा नाही असे दिसेल. भारतात सर्वसाधारण कुटुंब घरातील विवाहसोहळ्यांवर त्यांच्या संपत्तीच्या जवळपास १० ते १५ टक्के रक्कम खर्च करत असतात. समजा एखाद्या भारतीय कुटुंबाची संपत्ती ५० लाख ते १ कोटीपर्यंत असेल तर ते सर्वसाधारण १० ते १५ लाख रुपये लग्नावर खर्च करत असतात. अर्थात तुम्ही कोणत्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आहात, त्यावर लग्नाचा खर्च अवलंबून असतो."