Chinmay Mandlekar Diwali Firecrackers: दिवाळी आणि फटाके हे समीकरण दरवर्षी चर्चेत असते. फटाके फोडण्यामुळे होणारे प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि धार्मिक परंपरा यावरून अनेकदा वाद निर्माण होतो. यंदाही दिवाळीतील फटाक्यांवरून चर्चा सुरू असतानाच अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. फटाक्यांचा इतिहास आणि त्याचा हिंदू संस्कृतीशी जोडला जाणारा संबंध यावर त्याने प्रश्न उपस्थित केला आहे.
चिन्मय मांडलेकरने आपल्या पोस्टमध्ये फटाक्यांच्या उगमाचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, फटाक्यांचा शोध चिनी लोकांनी लावला. भारतीय उपखंडात त्यांचा प्रसार मुघलांनी केला. मात्र, आता फटाके फोडणे हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक मानले जात आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे की चीनमध्ये तयार झालेल्या विषारी फटाक्यांचा सण, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
चिन्मय मांडलेकर याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'Fire crackers फटाके पटाखे Invented by Chinese Popularised in Indian Subcontinent by Mughals But now measure of Hindu Sanskruti! Festival of lights or Festival of toxic China invented crackers?'
या पोस्टमधून त्याने फटाक्यांना हिंदू संस्कृतीशी जोडण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. दिवाळीचा खरा अर्थ प्रकाश, आनंद आणि उत्सव असा असताना फटाके फोडण्यालाच सणाचा महत्त्वाचा भाग का मानला जातो, असा त्याच्या पोस्टचा सूर आहे.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याने हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. अनेक शहरांमध्ये दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषण वाढते. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना होतो. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे प्राणी आणि पक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाके फोडावेत की नाही, यावर चर्चा होते. एका बाजूला धार्मिक परंपरा आणि सण साजरा करण्याचे स्वातंत्र्य आहे, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे.
चिन्मय मांडलेकरच्या या पोस्टमुळे दिवाळी आणि फटाके यांच्यातील संबंध पुन्हा चर्चेत आला आहे. फटाके फोडणे म्हणजेच दिवाळी साजरी करणे का? तसेच फटाके फोडण्याला हिंदू संस्कृतीचे प्रतीक मानणे कितपत योग्य आहे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.