Medha Deshmukh Bhaskaran pudhari
मनोरंजन

Medha Deshmukh Bhaskaran: ऐतिहासिक चित्रपटांत शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास; मेधा देशमुख-भास्करन यांची खंत

मुंबई पुस्तक महोत्सवात व्यक्त केले मत; शिवरायांचे राज्यशास्त्र आणि युद्धनीती अभ्यासण्याचे नव्या लेखकांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: व्यावसायिक गणितांमुळे सध्याच्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याची खंत प्रसिद्ध लेखिका मेधा देशमुख-भास्करन यांनी येथे व्यक्त केली.

नव्या लेखकांनी इतिहासातील नुसत्या लढायांचे काल्पनिक वर्णन करण्यापेक्षा शिवरायांच्या प्रगत राज्यशास्त्राचा आणि युद्धकौशल्याचा सखोल अभ्यास करून अचूक ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कालिना येथे सुरू असलेल्या मुंबई पुस्तक महोत्सवात 'स्वराज्य आणि राज्यकारभार' या विषयावर संवादक वर्षा मुळे यांनी लेखिका मेधा देशमुख-भास्करन यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आपल्या लेखनाचा उद्देश स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर मराठी भाषेत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र त्या तुलनेत इंग्रजी भाषेत मोजकीच पुस्तके उपलब्ध आहेत. ज्या अमराठी आणि इंग्रजी वाचकांना शिवाजी महाराज अजून पूर्णपणे माहीत नाहीत. त्यांच्यापर्यंत शिवरायांचे खरे कार्य पोहोचवण्यासाठी आपण हे पुस्तक लिहिले आहे.

शिवरायांच्या प्रशासकीय आणि लष्करी सुधारणांवर प्रकाश टाकताना भास्करन यांनी सांगितले की, मुघल सैन्यातील कार्यपद्धतीत अनेक त्रुटी होत्या. शिवाजी महाराजांनी या त्रुटी वेळीच ओळखून तत्कालीन पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणले.

ते नुसत्या लढाया लढले नाहीत. तर स्वतःची अशी अभ्यासपूर्ण युद्धनीती तयार करून त्यांनी हजारो शत्रूंवर विजय मिळवला. एवढे धाडसी पराक्रम करताना त्यांना धैर्य कोठून आले, याचा शोध इतिहासकारांनी आपल्या लेखणीतून घ्यायला हवा, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT