Mannat Bangla : शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये शिरला ८ फुटांचा साप; नागपंचमीच्या दिवशीच आढळल्याने रंगली चर्चा.. file photo
मनोरंजन

Mannat Bangla : शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये शिरला ८ फुटांचा साप; नागपंचमीच्या दिवशीच आढळल्याने रंगली चर्चा..

रेस्क्यू टीमने केला बचाव करत त्‍याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

पुढारी वृत्तसेवा

bollywood shahrukh khan mannat premises rescued 8 foot long snake nag panchami

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या आलिशान बंगल्याच्या परिसरात साप आढळल्याने खळबळ उडाली. १७ ऑगस्ट रोजी मन्नतच्या लॉनमध्ये दोन साप दिसले. त्यानंतर तातडीने रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. रेस्क्यू टीमने एका सापाला सुरक्षितपणे पकडले. या सापाची ओळख धामण म्हणजेच इंडियन रॅट स्नेक अशी झाली. हा साप बिनविषारी असून त्याची लांबी तब्बल ८ फूट होती.

किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये दिसले २ साप

मिळालेल्या माहितीनुसार, सर्परक्षक विक्की दुबे यांना मन्नतच्या परिसरात दोन साप दिसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

यावेळी मन्नतच्या आवारातील एका जिन्याखाली ८ फूट लांबीचा धामण साप आढळून आला. साप घाबरलेल्या अवस्थेत गुंडाळून बसला होता. रेस्क्यू टीमने कोणताही धोका न पत्करता त्याला सुरक्षितपणे पकडले आणि नंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, दुसरा साप मात्र लोकांची हालचाल सुरू झाल्यानंतर तिथून निसटला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.

बिनविषारी साप असल्याने मन्नतच्या कर्मचाऱ्यांनी घेतला सुटकेचा श्वास

पकडण्यात आलेला धामण साप बिनविषारी असल्याचे समोर आल्यानंतर मन्नतचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी सुटकेचा श्वास घेतला. धामण हा भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा बिनविषारी साप आहे. विशेष म्हणजे, १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशीच शाहरुख खानच्या मन्नतच्या परिसरात साप आढळल्याने या घटनेची चर्चा अधिक रंगली.

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला मुंबईतील वांद्रे परिसरातील बँडस्टँड येथे आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेला हा बंगला मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असून शाहरुख खानचे चाहते आणि पर्यटक मन्नतबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतात.

‘किंग’ चित्रपटामुळेही चर्चेत शाहरुख खान

दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात शाहरुख खानसोबत सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राघव जुयाल आणि राणी मुखर्जी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख २४ डिसेंबर २०२६ अशी काही वृत्तांत दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT