bollywood news rhea chakraborty life after sushant singh rajput death brother shovik father career ruined
पुढारी ऑनलाईन : रिया चक्रवर्ती यांच्या आयुष्यात सुशांतच्या मृत्यूनंतर मोठे बदल झाले. तिला करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागलाच, पण तिचा भाऊ आणि वडिलांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अभिनेत्रीने फराह खानसोबतच्या संवादात तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलांबद्दल सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने अनेकांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या अचानक निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती लोकांच्या निशाण्यावर आली, कारण त्यावेळी ती सुशांतला डेट करत होती. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणातही तिचे नाव समोर आले आणि तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिचा भाऊ शोविक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक वर्षे त्यांच्याविरोधात प्रकरण सुरू होते, ज्याचा तपास सीबीआयकडे होता. मात्र, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला.
रिया चक्रवर्तीने बराच काळ लोकांच्या द्वेषाचा सामना केला. त्याचा परिणाम तिच्या चित्रपट कारकिर्दीवरही झाला. तिचे करिअर अचानक अडचणीत आले. रियासोबत तिच्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागला. नुकतेच अभिनेत्रीने फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितले की, सुशांतच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ शोविक आणि वडिलांनाही करिअरमध्ये मोठा फटका बसला.
रियाच्या भावाच्या शिक्षणावरही झाला परिणाम
सुशांतच्या मृत्यूचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याबद्दल रियाने सांगितले की, त्यांना असे वाटत होते की समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारणे बंद केले आहे आणि तिचे आयुष्य जणू तिथेच थांबले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
अनेक वर्षांनंतर रिया आणि शोविक यांनी मिळून पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली. दोघांनी मिळून ‘चॅप्टर 2’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आणि पॉडकास्ट सुरू केला, जो चांगला सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, याच कमाईतून रियाने नवीन घरही खरेदी केले आहे.
रियाने सांगितले की, शोविकने CAT परीक्षेत 97 टक्के गुण मिळवले होते आणि त्याला IIMमध्ये प्रवेशही मिळाला होता. मात्र, 2020 मध्ये जेव्हा हे प्रकरण घडले, त्याच काळात रियाच्या भावाला अटक करण्यात आली. तुरुंगात गेल्यामुळे शोविकला आपल्या शिक्षणाचे पहिले ट्रायमेस्टर पूर्ण करता आले नाही. त्याची फीही भरली होती, मात्र तो शिक्षण सुरू ठेवू शकला नाही.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोघांसाठी आयुष्य आणखी कठीण झाले. रियाने सांगितले की, बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. ति म्हणाली, “आम्ही फक्त घरी बसून राहायचो. असे वाटायचे की समाजाने आम्हाला पूर्णपणे दूर केले आहे. मला चित्रपटांमध्ये कोणी काम दिले नाही. शोविकलाही नोकरी मिळत नव्हती. कोणतीही कॉर्पोरेट कंपनी त्याला नोकरी देण्यासाठी तयार नव्हती.”
रियाच्या वडिलांचीही गेली नोकरी
रियाने सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम त्यांच्या वडिलांवरही झाला. त्यांचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्यांना एका मोठ्या रुग्णालयात मेडिकल सुपरिटेंडंटची चांगली नोकरी मिळाली होती. मात्र, रिया चक्रवर्ती यांचे वडील असल्याचे रुग्णालयाला समजल्यानंतर त्यांना ती नोकरी सोडावी लागली.
रियाने 2020 ते 2025 या काळात मोठा संघर्ष केला. मात्र, आता तिने पुन्हा आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. कपड्यांचा ब्रँड आणि पॉडकास्टसोबतच तिने शोबिझमध्येही कमबॅक केले आहे. ति लवकरच नेटफ्लिक्सच्या एका सीरिजमध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मासोबत दिसणार आहे. याशिवाय, ती सध्या प्राइम व्हिडिओवरील ‘द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसत आहे.