bollywood diljit dosanjh supports cjp protest slams government said ready to be anti national
पुढारी ऑनलाईन : दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे पेपर लीक प्रकरणाविरोधातील आंदोलन सुरूच आहे. सोमवारी CJPने ‘संसद चलो’ मार्चचे आयोजन केले होते. यावेळी मोठा गोंधळ झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी बळाचा वापर केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
अभिजीत दिपके यांचे म्हणणे आहे की, मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता प्रकाश राज हे देखील या आंदोलनाशी जोडले गेले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिलजीतची पोस्ट व्हायरल
दिलजीत दोसांझने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत CJP आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे त्याने म्हटले आहे. यासाठी आपल्याला ‘अँटी-नॅशनल’ म्हटले गेले तरी त्याची पर्वा नसल्याचेही त्याने सांगितले.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दिलजीतने लिहिले, “आज जे काही झाले ते खूप चुकीचे झाले. विद्यार्थ्यांसोबत असे वागायला नको होते. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात.”
तो पुढे म्हणाला, “लोकांचा आवाज हाच देवाचा आवाज असतो. मला यापूर्वीही अनेकदा अँटी-नॅशनल म्हटले गेले आहे. आताही मला अँटी-नॅशनल म्हटले जाईल. शेतकरी आंदोलनानंतर मला मोठ्या टीकेला आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले. याबद्दल मी आजही उघडपणे सांगू शकत नाही. बाकी सर्व देव पाहत आहे, बाबा सर्व काही चांगले करतील.”
काय आहे वाद?
NEET-UG 2026 वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर लीक आणि OMR शीटमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून हा संपूर्ण वाद सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी विद्यार्थ्यांसोबत मिळून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे.
या आंदोलनाची सुरुवात 16 मे रोजी CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली होती. 28 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे जंतर-मंतरवरील CJPच्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जबरदस्तीने जंतर-मंतरवरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
CJPच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळाला आहे. शबाना आझमी, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, अनुराग कश्यप, शिल्पा राव यांच्यासह अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आपला आवाज उठवला आहे.