बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असून, रितेश देशमुख यांच्या नव्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. प्रोमो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, यावेळी घरात कोणते नवे ट्विस्ट आणि स्पर्धक येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Riteish Deshmukh bigg boss marathi - 6 coming soon
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक असलेला बिग बॉस मराठी पुन्हा एकदा नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ संदर्भात नुकताच प्रदर्शित झालेला रितेश देशमुख उर्फ रितेश भाऊचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” अशी टॉगलाईन म्हणत रितेश देशमुख बिग बॉस मराठी सिझन ६ वा घेऊन येत आहे. या सिझनचा नवा प्रोमो आल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे नव्या सिझनची. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. 'मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय...आहात ना तय्यार!' रितेश भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
बिग बॉस मराठीने मागील सिझनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. स्पर्धकांमधील वाद, मैत्री, डावपेच आणि भावनिक क्षण यामुळे हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. यावेळी कोणते सेलिब्रिटी घरात प्रवेश करणार, कोणते नवे टास्क असणार आणि बिग बॉस कोणते धक्कादायक ट्विस्ट आणणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नवा सिझन काय धुमशान घालणार आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag कुणाचा असणार? काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण कोण असणार, सर्व माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणूक, ढोलताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई, ३०० लोकांच्या उपस्थितीत बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा प्रोमो पार पडला. रितेश भाऊ पहिल्यांदाच यावेळी पारंपरिक वेशभूषेत दिसला. प्रोमोमधील रितेश भाऊंच्या डायलॉगनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ ते ११ जानेवारीपासून रोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि जिओहॉस्टारवर पाहता येणार आहे.