Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Journey Ends: बिग बॉस मराठीच्या घरात काल अचानक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. डबल एविक्शनमुळे प्रेक्षकांना जोरदार धक्का बसला. आयुष संजीव आणि करण सोनावणे या दोघांचा प्रवास एकाच दिवशी संपला. आठवड्याच्या सुरुवातीलाच रितेश देशमुखने दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्याचे संकेत दिले होते आणि प्रत्यक्षात तसचं घडलं.
करण सोनावणे हा घरातील धडाकेबाज स्पर्धक मानला जात होता. टास्कमध्ये त्याची मेहनत दिसत होती, प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा होता. पण अखेर कमी मतांमुळे करणला शो सोडावा लागला.
घरातून बाहेर पडताच करणने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली. बिग बॉसच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ टाकत त्याने लिहिलं “भाऊचा फायनल धक्का… माझा बिग बॉसचा प्रवास इथेच थांबतोय. यंदा ट्रॉफी ठाण्याला येत नाही. पण तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. मॅजिकवर विश्वास ठेवूया.”
या पोस्टमधून करणने आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. मात्र काही वेळातच त्याने आणखी एक स्टोरी टाकली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या स्टोरीत फक्त एक ओळ होती.
“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…” या एका वाक्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण पुढे काय होणार? एखादा नवा प्रोजेक्ट येणार? मोठी घोषणा होणार? की बिग बॉसमध्ये परत जाणार? याबाबत सध्या फक्त चर्चाच सुरू आहेत.
सोशल मीडियावर Focus Indian या नावाने करण ओळखला जातो. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण स्वतःच्या मेहनतीवर इथपर्यंत पोहोचला आहे. त्याचे रिल्स, मजेशीर व्हिडीओ आणि क्रिकेटशी संबंधित कंटेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
IPL सामने असोत किंवा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत केलेले रिल्स. करणचा वेगळा अंदाज चाहत्यांना आवडतोय. आता बिग बॉसचा अध्याय संपला असला, तरी करणने दिलेला “पिक्चर अभी बाकी है” चा इशारा नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे.