Bhushan Pradhan revealed Mysterious photo pudhari photo
मनोरंजन

Bhushan Pradhan revealed Mysterious photo|लग्नाची तारीख की चित्रपटाची? भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टचा अखेर उलगडा; कोण आहे त्याची 'स्वप्नसुंदरी'?

लग्नाची तारीख की चित्रपटाची? भूषण प्रधानच्या 'त्या' पोस्टचा अखेर उलगडा; 'स्वप्नसुंदरी' येणार भेटीला!

स्वालिया न. शिकलगार

तरुणाईचा लाडका अभिनेता भूषण प्रधानने काही दिवसांपूर्वी 'सेव्ह द डेट' 24.7.2026 म्हणत एक रोमँटिक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे तो लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक भूषण प्रधान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा प्रोफेशनल प्रोजेक्ट्समुळे जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक एंगेजमेंट रिंग आणि एका मुलीचा हात धरलेला फोटो शेअर करत 'सेव्ह द डेट' असे लिहिले होते. चाहत्यांना वाटले की भूषण अखेर लग्नबंधनात अडकणार आहे, पण आता हे सत्य समोर आले आहे की ही त्याच्या आगामी 'स्वप्नसुंदरी' या चित्रपटाची एक अनोखी प्रसिद्धी होती.

भूषण आणि सायलीची फ्रेश जोडी

या चित्रपटाचे नुकतेच एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले असून, यात भूषण प्रधान आणि 'स्वप्नसुंदरी' म्हणून सायली पाटील दिसत आहेत. पोस्टरमध्ये निसर्गरम्य वातावरणात ही जोडी एकमेकांच्या प्रेमात हरवलेली दिसते. सायलीचा पारंपरिक लूक आणि भूषणच्या डोळ्यातील प्रेम यामुळे या दोघांच्या केमिस्ट्रीची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी एक ताजी टवटवीत अनुभूती देणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

काय आहे 'स्वप्नसुंदरी'ची कथा?

चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट एका स्वप्नवत प्रेमकथेवर आधारित असल्याचे समजते. प्रत्येकाच्या मनात आपली एक 'स्वप्नसुंदरी' असते, तिचा शोध आणि त्या प्रवासात येणारी भावनिक वळणे या चित्रपटात पाहायला मिळतील. दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी या कथेबद्दल बोलताना सांगितले की, "हा चित्रपट केवळ प्रेमप्रकरण नसून स्वतःच्या भावनांचा शोध घेणारा प्रवास आहे. प्रेक्षकांना यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल."

प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात, काही इच्छा असतात आणि कुणीतरी खास व्यक्ती असते ज्याचा आपण शोध घेत असतो. 'स्वप्नसुंदरी' ही त्या शोधाची, त्या भावनांची आणि त्या नात्यांच्या प्रवासाची गोष्ट आहे. प्रेक्षकांना या कथेमध्ये स्वतःच्या आयुष्यातले अनेक क्षण दिसतील. हा चित्रपट त्यांच्या मनाला स्पर्श करेल, त्यांना विचार करायला लावेल आणि त्याचवेळी त्यांना एक वेगळी अनुभूती देईल.
अक्षय जयसिंगराव शिंदे, दिग्दर्शक

२४ जुलैला होणार प्रदर्शित

रेडबेल मीडिया निर्मित हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषणने ज्या पद्धतीने या चित्रपटाची घोषणा केली, त्यामुळे चित्रपटाबद्दल आधीच मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. 'सेव्ह द डेट' मधील ती अंगठी आणि तो हात सायली पाटीलचाच होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT