Awarapan 2 Trailer Pudhari
मनोरंजन

Awarapan 2 Trailer: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीचं जबरदस्त कमबॅक; 'आवारापन 2'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Awarapan 2 Trailer: इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित 'आवारापन 2' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो पुन्हा एकदा शिवम पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Awarapan 2 Trailer: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित 'आवारापन 2' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. जवळपास दोन दशकांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात इमरान पुन्हा एकदा शिवम पंडितच्या भूमिकेत दिसणार असून यावेळी त्याचा आक्रमक आणि सूडाने पेटलेला अंदाज पाहायला मिळत आहे.

सुमारे 1 मिनिटे 25 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये शिवम पंडितचा प्रवास पुन्हा एकदा उलगडताना दिसतो. भूतकाळातील हिशोब चुकता करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. अॅक्शन, भावनिक संघर्ष आणि सूडाची कथा यांचा संगम असलेला हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

दिशा पटानीचा अॅक्शन अवतार

या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी एका पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये ती हातात बंदूक घेऊन जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसते. तिचा हा अवतार यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता.

त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी चित्रपटातील मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता असून ट्रेलरमध्ये त्यांची प्रभावी झलक पाहायला मिळते. चित्रपटात सुविंदर विक्की, विजयंत कोहली, अनिरुद्ध रावल आणि अतुल कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'आवारापन' पुन्हा थिएटरमध्ये झळकणार

अलीकडेच इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान इमरान हाश्मीने चाहत्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली. 'आवारापन 2' प्रदर्शित होण्यापूर्वी 2007 मध्ये प्रदर्शित झालेला मूळ 'आवारापन' चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार असल्याचे त्याने सांगितले.

इमरान म्हणाला, "ज्यांनी पहिला 'आवारापन' पाहिला आहे, त्यांच्यासाठी दुसरा भाग जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरेल. तर नव्या पिढीतील प्रेक्षकांनी पहिला चित्रपट पाहिलेला नसेल, त्यामुळे 'आवारापन 2' पाहिल्यानंतर त्यांना मूळ कथा जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होईल. म्हणूनच आम्ही 'आवारापन' पुन्हा प्रीक्वेल म्हणून थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहोत."

अफवांना पूर्णविराम

गेल्या काही दिवसांपासून 'आवारापन 2'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र चित्रपटाचे निर्माते आणि इमरान हाश्मी यांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चित्रपटाची निर्मिती कोण करत आहे?

'आवारापन 2'ची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केले आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा बिलाल सिद्दीकी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स यांच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे, 29 जून 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'आवारापन' आजही इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. आता जवळपास 19 वर्षांनंतर त्याचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT