Awarapan 2 Mohit Suri Emraan Hashmi: इमरान हाश्मीचा बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच, दिग्दर्शक मोहित सूरी यांनी ‘आवारापन 2’बद्दल एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’च्या आठवणींना उजाळा देताना मोहित यांनी हा चित्रपट आजही आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असल्याचं म्हटलं आहे.
मोहित सूरी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘आवारापन 2’चा ट्रेलर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मते, हा चित्रपट त्यांच्यासाठी एखाद्या दीर्घकाळापासून दुरावलेल्या प्रेमासारखा किंवा अनेक वर्षांनी भेटणाऱ्या जुन्या मित्रासारखा आहे. काळ बदलला असला तरी या चित्रपटाशी जोडलेल्या भावना आजही तितक्याच जिवंत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मोहित सूरी यांनी लिहिलं की, जवळपास 19 वर्षांनंतर ‘आवारापन’ पुन्हा एका नव्या रूपात समोर येताना पाहणं त्यांच्यासाठी भावनिक अनुभव आहे. ‘आवारापन 2’च्या ट्रेलरमुळे पहिल्या चित्रपटाच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्याचं त्यांनी सांगितलं.
या चित्रपटासाठी दिग्दर्शक नितीन कक्कर यांचे आभार मानताना मोहित यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांच्या मते, ‘आवारापन’च्या जगाला नव्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात आलं आहे.
‘आवारापन’ आणि इमरान हाश्मी हे समीकरण प्रेक्षकांसाठी विशेष आहे. त्यामुळे ‘आवारापन 2’मध्ये इमरान पुन्हा एकदा दिसणार असल्याने मोहित सूरी यांच्यासाठीही हा क्षण खास आहे.
इमरान हाश्मीला आपला ‘भाऊ’ आणि ‘हिरो’ म्हणत मोहित यांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं. जवळपास दोन दशकांपूर्वी ज्या प्रकारे इमरानने त्यांच्या चित्रपटासाठी स्वतःला झोकून दिलं होतं, त्याच समर्पणाने त्याने या नव्या चित्रपटासाठीही काम केल्याचा विश्वास मोहित यांनी व्यक्त केला.
‘आवारापन 2’मध्ये इमरान हाश्मीसोबत दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोहित यांनी दिशाचंही कौतुक करत तिचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. तसेच निर्माता विशेष भट्ट यांच्यावर आता या चित्रपटाची जबाबदारी सोपवल्याचं सांगत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ‘आवारापन 2’ 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या ‘आवारापन’चं दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केलं होतं. मात्र यावेळी दिग्दर्शनाची धुरा नितीन कक्कर यांनी सांभाळली आहे.
इमरान हाश्मीचा वेगळा अंदाज, दिशा पटानीची भूमिका यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मोहित सूरी यांच्या भावूक पोस्टमुळे या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.