Avatar Fire and Ash trailer out
मुंबई - जेम्स कॅमेरून दिग्दर्शित अवतार ३ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये नव्या विलेनची एन्ट्री झाल्याने पेंडोराच्या दुनियेत खतरनाक काहीतरी घडणार हे नक्की. हा चित्रपट भारतात १९ डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज केला जाईल.
बहुप्रतीक्षित 'अवतार' फ्रँचायझीमधील तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, 'अवतार ३' चा पहिला धमाकेदार ट्रेलर आज जगभरात प्रदर्शित करण्यात आला. पेंडोराच्या अद्भुत दुनियेची नवी झलक तसेच एक शक्तिशाली आणि रहस्यमय विलेनची ओळख करून देण्यात आलीय.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' च्या यशानंतर, दिग्दर्शक पुन्हा एकदा प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यास सज्ज झाले आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये डोळे दिपवून टाकणारे व्हिज्युअल इफेक्ट्स दिसत आहेत. जेक सुली आणि नेतिरी यांचे परिवार आता धोकादायक संकटाचा सामना करायला तयार असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
ट्रेलरमध्ये नव्या विलेनची झलक पाहायला मिळतेय. पँडोरावरीलच एक नवी जमात जेक सुलीच्या विरोधात उभी राहिलेली दिसतेय. ही जमात अग्नी आणि ज्वालामुखीशी संबंधित असल्याचे दिसून येते, ज्यामुळे त्यांना 'ॲश पीपल' म्हटले जात आहे.
निर्मात्यांनी 'अवतार ३' भारतात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.