Preity Zinta | इंडियन प्रीमियर लीग (IPL)मधील बॉलीवूड अभिनेता आणि अभिनेत्री सहभाग सर्वश्रुत आहे. त्यामुळेच शाहरुख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (PBKS) ची सह-मालक, अभिनेत्री प्रीती झिंटाचा पंजाब किंग्ज हे संघ विशेष चर्चेत असतात. प्रीतीची पंजाबच्या प्रत्येक सामन्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरते. त्यामुळेच आयपीएलमध्ये सातत्याने चर्चेत राहणार्या चेहर्यात तिचा समावेश होता. आता एका चाहत्याने तिचे नाव थेट क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलसोबत जोडले. यावर ती युजरवर चांगलीच भडकली. तिने त्याला सडेतोड प्रत्युत्तरही दिले. जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला पंजाब किंग्ज (PBKS) संघाने लिलावात ४.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याने यावर्षी सात सामन्यांमध्ये केवळ ४८ धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या. प्रीती झिंटा यांनी एक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरच्या प्रश्न विचारला की, ‘मॅडम, मॅक्सवेलशी तुमचं लग्न झालं नाही म्हणून तो तुमच्या टीमसाठी चांगला खेळत नाही का?’ यावर प्रीती झिंटा चांगलीच भडकली.
युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रीती झिंटा म्हणाली, ‘तुम्ही हेच प्रश्न पुरुष टीम मालकांना विचारता का? की हा भेदभाव केवळ महिलांपुरताच मर्यादित आहे? मला कधीच माहित नव्हतं की कॉर्पोरेट जगतात महिलांसाठी काम करणं किती कठीण असतं, मला खात्री आहे की तुम्ही हा प्रश्न मजेत विचारला असेलच; पण मी आशा करते की तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा एकदा पाहाल आणि समजून घ्याल की तुम्ही नेमकं काय म्हणायचं ठरवत आहात. मी गेल्या 18 वर्षांपासून प्रचंड मेहनतीने माझी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे कृपया मला मी ज्या सन्मानास पात्र आहे तो द्या आणि लिंगभेद थांबवा. धन्यवाद.’
या वेळी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड स्टार्सच्या शांततेबद्दलही एका युजरने प्रीतीला प्रश्न विचारल की, ‘ या हल्ल्याबाबत तुमचं यावर काय मत आहे? इतके सहकलाकार आणि प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स पहलगाम हल्ल्याविषयी काहीच बोलले नाहीत “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान आपल्या सशस्त्र दलांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले नाहीत? आम्ही तुमचं कौतुक करतो की तुम्ही भारतासाठी उभी राहिलात, पण बॉलिवूडमधील बरेच लोक तसे करत नाहीत.’ यावर प्रीती म्हणाला की, ‘मी सर्वांसाठी बोलू शकत नाही कारण प्रत्येकाचं जग पाहण्याचं दृष्टीकोन वेगळं असतो. मी एका लष्कर अधिकार्याची मुलगी आहे. सैनिकी पार्श्वभूमीमधून आलेली आहे, त्यामुळे हे विषय माझ्या मनाच्या खूप जवळचे आहेत. संयम, घाम, रक्त, अश्रू हे मी सर्व खूप जवळून अनुभवलं आहे. कधी कधी मला वाटतं की एका सैनिकाचे कुटुंबीय हे स्वतः सैनिकापेक्षा अधिक मजबूत असतात! तुम्ही त्या मातांना पाहिलंय का ज्या आपल्या मुलांना देशासाठी बलिदान देतात? त्या पत्नी ज्या कधीच आपल्या नवऱ्याला पुन्हा हसताना पाहणार नाहीत? ती मुलं ज्यांना त्यांच्या आईवडिलांकडून कधीच जीवनभर मार्गदर्शन मिळणार नाही? हीच त्यांची खरी वास्तविकता आहे आणि इतरांची मते किंवा प्रतिक्रिया यामुळे ती कधीच बदलणार नाही, म्हणून देव त्यांचं रक्षण करो.’